केळीवर करप्याचा प्रादुर्भाव

0

यावल । तालुक्यात चार हजार हेक्टरवर नवती, तर तीन हजार हेक्टरवरील पिलबागवर करप्याचा प्रादुर्भाव वाढला आहे. प्रथम टप्प्यावर असलेल्या करप्यामुळे केळीची पाने सुकायला सुरुवात झाली असून, याचा थेट उत्पादनावर परिणाम होणार असल्याने केळी उत्पादक शेतकरी चिंतेत सापडला आहे. यावल तालुका केळी आणि उसाच्या बागायती शेतीसाठी ओळखला जातो. यापैकी उसावर आधीच पांढर्‍या माशीचा प्रादुर्भाव झाल्याने उपाययोजनेत शेतकरी व्यस्त आहेत. हे कमी म्हणून की काय, हिवाळ्यात गेले शेवटचे दोन महिने पडलेल्या कडाक्याच्या थंडीमुळे केळीला करप्याचा विळखा पडला आहे.

केळीची पाने वाळली

करप्यामुळे आगामी दीड महिन्यात कापणीवर येणार्‍या नवतीच्या केळीची पाने वाळत आहेत. त्यामुळे प्रकाश संश्लेषण प्रक्रियेवर परिणाम होऊन केळीच्या घडाला आवश्यक पोषण तत्त्वे मिळणार नाहीत. परिणामी, घडाचे वजन कमी होणे, अवेळी घड पिकणे आदी समस्या उद्भवू शकतात. पाने सुकून पिलबागची वाढ खुंटल्यास दर्जेदार उत्पादन मिळणार नाही. तालुका कृषी विभागाकडे सध्या अ‍ॅसिफेट- 310 किलो, मॅन्कोझेब- 1690 किलो आणि कार्बेडडेझिम 2000 किलो उपलब्ध आहे. उर्वरित औषधांची मागणी जिल्हा कार्यालयाकडे यापूर्वीच नोंदवण्यात आली आहे.

कृषी विभागावर आशा

तालुक्यात यंदा शेतकर्‍यांकडून मोठ्या प्रमाणावर पिलबागची लागवड करण्यात आलेली आहे. आता थंडीची लाट ओसरली असली तरी, यापूर्वीच्या लाटेमुळे केळीवर करप्याचा प्रादुर्भाव वाढला. करप्याची लागण होण्याच्या पहिल्या टप्प्याचे दुष्परिणाम जाणवण्यास सुरुवात झाल्याने शेतकरी पुन्हा अडचणीत आला आहे.

या आपत्तीवर मात करण्यासाठी शेतकरी तालुका कृषी विभागाकडे आशेने पाहत आहेत. कारण करपा निर्मूलनासाठी कृषी विभागाकडून अनुदानावर उपलब्ध होणारे फवारणी किट अजूनही पूर्णपणे उपलब्ध होताना दिसत नाही. हे किट वेळेवर उपलब्ध झाल्यास करपा नियंत्रण सोईचे होईल. त्यामुळे यासंदर्भात कृषी विभागाने देखील लक्ष देण्याची आवश्यकता आहे.