केळीवर निपाह विषाणू असल्याच्या अफवेला पूर्णविराम

0

माजी मंत्री एकनाथ खडसे आणि शिष्टमंडळाच्या प्रयत्नांना यश

भुसावळ- नवी दिल्ली येथिल कृषी मंत्रालयात केंद्रीय कृषी मंत्री राधामोहन सिंग यांची माजी महसूल व कृषी मंत्री आमदार एकनाथराव खडसे, खासदार रक्षा खडसे, आमदार हरीभाऊ जावळे, जिल्हा परीषद उपाध्यक्ष नंदू महाजनआदींच्या शिष्टमंडळाने भेट खान्देशातील चक्रीवादळाने झालेल्या केळीच्या नुकसानीसंदर्भात माहिती देऊन भरीव मदतीची मागणी केली होती शिवाय उत्तर भारतात निपाह विषाणूच्या अफवेमुळे पडून असलेल्या केळीबाबत माहिती देत उपाययोजनांची माहिती दिली होती. मंत्री सिंग यांनी लागलीच याबाबत दखल घेत उत्तर भारतातील केळीच्या तपासणीचे आदेश दिले होते. केळीच्या तपासणीनंतर त्या केळीवर निपाह विषाणू नसल्याचा अहवाल प्राप्त झाल्याने खान्देशातील केळी उत्पादक सुखावले आहेत. भारतीय कृषी अनुसंधान परीषदेच्या भोपाळ येथील राष्ट्रीय उच्च सुरक्षा पशुरोग संस्थानचे संचालक डॉ.वी.पी.सिंह यांनी केळी नमुन्याचा अहवाल केंद्रीय कृषी मंत्री राधामोहन सिंग आणि खासदार रक्षा खडसे यांना पाठवला असून त्यात ान्देशातील केळीच्या नमुन्यातील एकही केळे विषाणू बाधीत आढळले नसल्याचे नमूद करण्यात आले आहे.

निपाह विषाणू नसल्याने उत्पादकांना दिलासा
निपाह रोगाचे विषाणू केळीवर असल्याच्या अफवेमुळे उत्तर भारतात केळी खरेदी करण्यासाठी व्यापारी तयार नाहीत परीणामी 10 ते 12 दिवसांपासून तेथील बाजारपेठेत सुमारे एक हजार टन केळी पडून असल्याने केळी उत्पादक शेतकरी, व्यापारी, माल वाहतूकदारांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले होते. 6 जून रोजी खासदार रक्षा खडसे यांनी केंद्रीय कृषी मंत्री राधामोहन सिंग यांना निपाह व्हायरस संदर्भात पत्र पाठवले होते. जळगाव आणि बुलढाणा परिसरातील केळीवर कोणत्याही प्रकारची लागण नसून, उत्तर भारतात पडून असलेल्या केळीमधील नमुने तपासणीसाठी पाठवावेत. खान्देशातील केळी वर निपाह रोगाचे विषाणू असल्याची अफवा पसरवणार्‍यांवर कडक कारवाई करावी, अशी मागणी शिष्टमंडळाने केंद्रीय कृषिमंत्री राधा मोहन सिंग यांच्याकडे केली होती. त्याअनुषंगाने केंद्रीय कृषिमंत्री राधामोहन सिंग यांनी सदर केळीचे नमुने व्हायरॉलॉजी विभागाकडे पाठवून त्याची दोन दिवसात तपासणी करावी आणि सरकार कडून खान्देशातील केळीवर निपाह रोगाचे विषाणू नसल्याचा संदेश प्रसारित करण्यात यावा, अशी सूचना दिली होती. तपासणीत खान्देशातील केळीवर निपाह विषाणू नसल्याचा अहवाल प्राप्त झाल्याने उत्पादक सुखावले आहेत.

क्षतीग्रस्त केळे खाऊ नये
साल न काढलेले केळे कोणत्याही प्रकारे बाधीत होऊ शकत नाही. सावधगिरी म्हणून क्षतीग्रस्त केळे खाऊ नये, असा इशारा या लॅबने दिला आहे. यामुळे जळगाव आणि बुलढाणा जिल्ह्यातील केळी उत्पादक शेतकरी, व्यापारी, माल वाहतूकदार यांच्यात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.

शिष्टमंडळात यांचा होता समावेश
शिष्टमंडळात माजी सभापती सुरेश धनके, रावेर तालुकाध्यक्ष सुनील लक्ष्मण पाटील, पंचायत समिती सदस्य विकास पाटील, गोपाळ लक्ष्मण नेमाडे, प्रल्हाद पंडित पाटील, महेश नारायण पाटील, रमेश कडू पाटील, किशोर रामू महाजन, काशीनाथ मोतीराम धनगर, रामदास त्र्यंबक पाटील या शेतकर्‍यांचा समावेश होता.