केळीवर ‘निपाह नाही : रावेरातील बाजार समितीतील बैठकीत पदाधिकार्‍यांची माहिती

0

रावेर- रावेरातून उत्तर प्रदेश व पंजाबमध्ये गेलेली हजारो टन केळी निपाह व्हायरसच्या अफवनेने पडून असून याची माहिती मिळताच रावेरात बाजार समितीत आमदार हरिभाऊ जावळे यांच्या उपस्थितीत तातडीने बैठक घेण्यात आली. केळीवर आजपर्यंत असा कुठलाही व्हायरस आला नव्हता व आलेला नाही, अशा अफवांवर विश्‍वास ठेवू नये, असे आवाहन या बैठकीत उपस्थित व्यापारी व पदाधिकार्‍यांनी केले. गेल्या काही दिवसांपासून केरळात निपाह व्हायरसने थैमान घातले आहे.

दरम्यान, रावेरातून पंधराशे ते दोन हजार टन केळी उत्तरप्रदेश, पंजाब, हरियाणा या ठिकाणी गेली आहे. परंतु या व्हायरसच्या अफवेने ही केळी पडून असून तेथील जनतेत निपाह विषयी भीती पसरल्याने ही केळी घेण्यास कुणी तयार नसल्याचे तेथील व्यापार्‍यांचे रावेरातील व्यापार्‍यांना फोन येत आहे. या विषयीत तातडीने बाजार समितीत आज बैठक घेण्यात आली. या बैठकील आमदार हरिभाऊ जावळे, माजी आमदार अरूणदादा पाटील, माजी शिक्षक सभापती सुरेश धनके, जिल्हा परिषद उपाध्यक्ष नंदकिशोर महाजन कृउबा सभापती निळकंठ चौधरी, माजी नगराध्यक्ष हरिश गणवाणी, अजय शर्मा, जिप सदस्य कैलास सरोदे, किसान सभा जिल्हाध्यक्ष सोपान पाटील व्यापारी व शेतकरी उपस्थित होते. केळीवर असा कोणताही व्हायरस येऊ शकत नाही, अशी माहिती उपस्थितांनी यावेळी दिली आहे.