आठवड्याभरात शंभर रुपयांनी दर वाढले ; स्थिर दराची अपेक्षा
भुसावळ- दिल्लीसह उत्तर भारतातील उत्तर प्रदेश, बिहार, चंदीगड आदी राज्यांमध्ये खान्देशातील केळीला मागणी वाढली असून गत आठवड्याभरात केळीचे दर प्रतिक्विंटल 100 रुपयांनी वाढले आहेत. रमजाननिमित्त महिनाभर केळीला मागणी कायम राहणार असून उत्पादकांमध्ये समाधान व्यक्त होत आहे.
रमजाननिमित्त केळीला मागणी वाढली
खान्देशातील केळीत गोडवा अधिक असल्याने खवैय्यांना या केळीला अधिक मागणी असते. गेल्या महिन्याभरापूर्वी खान्देशी केळीपेक्षाही गुजरात, आंध्रप्रदेश, तामिळनाडू आदी राज्यातील दर्जेदार केळी बाजारात उपलब्ध झाली आहे. यामुळे खान्देशातील केळीचे दर कोसळले होते. गत आठवड्यात 11 मे रोजी नवती केळीचे दर 975 रुपये होते तर पिलबाग केळीचे दर 825 रुपये होते. केवळ 16 रुपयांचा फरक असल्याने केळीवर प्रचंड मंदी कायम होती. दिल्ली आणि उत्तर भारतात मागणी घटल्याने केळी व्यापार्यांकडून बोर्डाच्या दरापेक्षाही 100 ते 150 रुपये कमी देवून केळीची कापणी झाली. यासह फरकाची रक्कम शेकर्यांना मिळालीच नाही. मंदीच्या या काळातच रमजान महिन्यामुळे केळीची आवक वाढली. सहा दिवसांत केळीचे दर 100 व 20 चा फरक असल्याने उच्चप्रतीच्या केळीला एक हजार 166 रुपये दर मिळाले. हे दर आता रमजान अखेरपर्यंत टिकून राहतील, अशी शक्यताही वर्तविण्यात येत आहे. यामुळे शेतकर्यांमध्ये समाधान व्यक्त होत आहे.
पिलबागचे दर हजारावर पोचले
रमजान महिन्यात पिलबागच्या केळीलाही चांगली मागणी आहे. यामुळे सध्या पिलबागचे दर प्रतिक्विंटल 925 रुपये 20 चा फरक असे आहेत. अर्थात उच्चप्रतीच्या पिलबाग केळीला एक हजार 45 रुपयांचे दर मिळत आहेत. पिलबागचे दर गेल्या दोन महिन्यांपासून तीन अंकी रक्कमेवर स्थिरावले होते. रमजान महिन्यातील मागणीमुळे हे दरही हजाराच्या वर पोचले आहेत.