केळी फळ पीक विमा रकमेच्या वाटपात झाला दुजाभाव

0

साकळी । साकळी सर्कलमधील 469 शेतकर्‍यांना 59 लाख 13 हजार 550 रुपयांचा केळी फळ पीक विमा योजनेचा लाभ मिळाला आहे मात्र साकळी सर्कलमधील शेतकर्‍यांना इतर सर्कलच्या तुलनेने अल्प लाभ मिळाला असून केवळ हेक्टरी 11 हजार 500 रुपयांचा लाभ मिळाल्याने शेतकर्‍यांमध्ये नाराजी व्यक्त केली जात आहे.

साकळी सर्कलमध्ये पाच सोसायट्या
साकळी सर्कलमध्ये साकळी विविध कार्यकारी सोसायटी, मनवेल विविध कार्यकारी सोसायटी, शिरसाड विविध कार्यकारी सोसायटी, चुंचाळे विविध कार्यकारी सोसायटी आणि डांभुर्णी विविध कार्यकारी सोसायटी अशा पाच वि.का.सों.चा समावेश आहे. साकळी वि.का.सो. मधील 111 शेतकर्‍यांना केळी फळ पीक विमा योजनेंतर्गत 120 हे 40 आर. क्षेत्रासाठी 13 लाख 84 हजार 600 रुपयांचा शेतकर्‍यांना लाभ मिळाल्याची माहिती सुत्रांनी दिली. शिरसाड वि.का.सो.त 58 शेतकर्‍यांना त्यांच्या 51 हे. 50 आर क्षेत्रासाठी पाच लाख 92 हजार 350 रुपयांचा लाभ मिळाल्याची माहिती सचिव अरविंद खंबायत यांनी दिली. मनवेल वि.का.सो.च्या 34 सभासदांना 51 हे. 80 आर क्षेत्रासाठी पाच लाख 95 हजार 700 रुपयांचा लाभ मिळाला, अशी माहिती मनवेल वि.का.सो.चे सचिव सुनील सुरवाडे यांनी दिली. चुंचाळे वि.का.सो.मधील 107 शेतकर्‍यांना त्यांच्या 109 हे.10 आर. क्षेत्रासाठी 12 लाख 54 हजार 650 रुपयांचा केळी फळ पीक विमा योजनेचा लाभ मिळाल्याची माहिती सचिव यांनी दिली. डांभुर्णी वि.का.सो.मधील 149 शेतकर्‍यांना त्यांच्या 174 हे.30 आर क्षेत्रावर 20 लाख 86 हजार 350 रुपयांचा केळी फळ पीक विमा योजनेचा लाभ मिळाल्याची माहिती सचिव टी.एम.भारंबे यांनी दिली. याशिवाय साकळी येथील जे.डी.सी.सी. बँकेतील 11 बिगर कर्जदार सभासदांना 1 लाख 44 हजार रुपयांचा लाभ मिळाल्याची माहिती बँकेच्या सुत्रांनी दिली.

शेतकर्‍यांवर अन्याय
केळी फळ पीक विमा अंतर्गत जी नुकसान भरपाई मिळाली आहे ती अन्याय करणारी आहे. आजुबाजुच्या महसूल मंडळांना 28 हजार 750 एकरी लाभ मिळाला तर साकळी किनगाव महसूल मंडळांना 11 हजार 500 लाभ मिळाला. असा अन्याय का? याप्रकरणी योग्य कागदपत्रांसह शासनाकडे दाद मागण्यात येईल.
– दीपक नागो पाटील
शेतकरी, ग्रामपंचायत सदस्य, साकळी

केळी फळपिक विमा निधी अत्यल्प
साकळीपासून दोन किलोमीटर असलेल्या नावरा या गावी हेक्टरी 28 हजार 750 तर साकळी येथे हेक्टरी 11 हजार 500 असा फरक का करण्यात आला. मी विमा भरणार नव्हतो. मात्र बँकेने परस्पर पैसे कपात केल्याने नाईलाज झाला. शासनाने फळपिक विमा संदर्भातील फरक लक्षात घेवून योग्य तो न्याय द्यावा.
– भिका राजाराम पाटील
प्रगतीशील शेतकरी, साकळी