केशवस्मृती प्रतिष्ठानतर्फे हरिविठ्ठल नगरात नववर्षदिनी स्वागतयात्रा उत्साहात

0

जळगाव : केशवस्मृती प्रतिष्ठान संचालित सेवावस्ती विभागाच्या माध्यमातून हरिविठ्ठल नगर येथे नववर्ष स्वागत यात्रा काढण्यात आली होती. स्वागत यात्रेचे यंदा चौथेवर्ष होते तर यावेळी स्त्री शक्तीला केंद्रीभूत ठेवून ही यात्रा काढण्यात आली होती. यात महिला ढोल पथक, लेझीम पथक, महिला भजनी मंडळ आदी आकर्षण ठरले. यावर्षी प्रतिष्ठानच्या वतीने सेवावस्ती विभागात मोठ्या प्रमाणात महिला सशक्ती करणाचा विषय हाती घेतला आहे. ज्यात महिला वाचनालय, महिला भजनी मंडळ, विविध आरोग्य तपासणी शिबीरे, महिलांसाठी विविध प्रकल्पात सहली, महिलांसाठी व्यवसाय प्रशिक्षण केंद्र, किशोरी विकास प्रकल्प, कुकिंग क्लास, शिवण क्लासच्या माध्यमातून वर्षभरापासून महिलांसाठी विविध कार्यक्रम घेण्यात येत आहे. ज्या महिलांच्या हातात झाडू आणि लाटणे होते त्या महिलांच्या हातात लेझीम, ढोल, टाळ-मंजिरे आणि मानाची गुढी देण्यात आली होती. हा बदल गेल्या 5 वर्षांपासूनच्या कार्यक्रमाचे फलित असल्याचे मत प्रकल्प प्रमुख डॉ. विवेक जोशी यांनी व्यक्त केले. हरिविठ्ठल नगर येथून निघालेली ही स्वागत यात्रा मारुती मंदिरावर संपन्न झाली.

यात्रेचा समारोप
समारोपाच्या कार्यक्रमात क्षुधाशांती सेवासंस्थेचे संचालक सुनील याज्ञिक, डॉ.विवेक जोशी, नगरसेविका पार्वताबाई भिल आणि चमेला महाजन उपस्थित होत्या. स्वागत यात्रा यशस्वी करण्यासाठी प्रकल्प समन्वयक स्नेहा तायडे, एकता भजनी मंडळ, हरीकेशव ज्येष्ठ नागरिक संघ, रामराज्य मित्र मंडळ, शुभम विंचवेकर, रुपेश भाकरे, रिद्धी वाडीकर, मयंक नागला, ज्योती बारी, मंगला अहिरे, अशोक महाजन, जिजामाता विद्यालय आदींचे सहकार्य लाभले.