कैफच्या सडेतोड उत्तराने पाक ट्रोलरची बोलती बंद!

0

मुंबई । भारतीय नागरिक कुलभूषण जाधव प्रकरणात आंतरराष्ट्रीय न्यायालयाच्या निर्णयावर भारताच्या अनेक बड्या व्यक्तींनी आनंद व्यक्त केला आहे. सोशल मीडियावर सक्रिय असणारे वीरेंद्र सेहवाग आणि मोहम्मद कैफ हे भारतीय क्रिकेटपटूही या आनंदोत्सवात मागे नव्हते. त्यांनीही लगेचच ट्विटरवरून देशभक्तीची भावना व्यक्त करताना आंतरराष्ट्रीय कोर्टाचे आभार मानले. पण सेहवाग आणि कैफचे हे ट्विट पाकिस्तानमधील सोशल मीडिया युझर्सना पचवता आले नाही. त्यांनी दोघांना ट्रोल करायला सुरुवात केली.

तुम्ही कमी बुद्धीचे आहात. अजून अंतिम निर्णय आलेला नाही. आंतरराष्ट्रीय कोर्टाने स्थगिती दिली असली, तरी आम्ही फासावर लटकवणार, जिथे जायचे आहे तिथे जा, असे एका युझरने म्हटले होते. त्यावर हजरजबाबी सेहवागने आपल्या खास शैलीत त्यांना उत्तर दिले. अंतिम निकाल येईपर्यंत कुलभूषण जाधव यांना फाशी देऊ नये, असा निर्णय आंतरराष्ट्रीय न्यायालयाने गुरुवारी दिला. या निर्णयानंतर संपूर्ण देशात आनंदाची लाट पसरली.

आयसीजेच्या निर्णयानंतर मोहम्मद कैफनेदेखील ट्विट केले. भारताचे अभिनंदन, आंतरराष्ट्रीय न्यायालयाचे आभार. सत्याचा विजय झाला, असे कैफने आपल्या ट्विटमध्ये म्हटले. मोहम्मद कैफचे हे ट्विट पाकिस्तानच्या एका ट्विपलच्या फारच मनाला लागले. आमिर अक्रम नावाच्या युझरने कैफच्या ट्विटवर प्रतिक्रिया देताना नावातून मोहम्मद शब्द हटवण्यास कैफला सांगितले. यावर कैफनेही चोख प्रत्युत्तर दिले. जर मी भारताच्या विजयाचे समर्थन केले, तर मला माझ्या नावातून मोहम्मद हटवायला हवे? मला माझ्या नावावर अभिमान आहे. आमिरचा अर्थ आहे, जीवनात परिपूर्ण. तुलाही त्याची गरज आहे. मोहम्मद कैफने यानंतर आणखी एक ट्विट करून लिहिले की, कोणीही कोणत्या धर्माचा ठेकेदार नाही. ठेकेदारांचा कोणाच्याही नावावर कॉपीराइट नाही. भारत सर्वसमावेशक आणि सहिष्णू देश आहे.