नवी दिल्ली – गेल्या ७० वर्षांच्या काळात कॉंग्रेसने मुस्लिमांच्या मनात मोठ्या प्रमाणावर विष भिनवले गेले आहे. ते बऱ्याच प्रमाणावर कमीही झाले आहे. मात्र तरीही ते पूर्णपणे नष्ट करण्यासाठी आणि मुस्लिमांची मने जिंकण्यासाठी मोदी सरकारला प्रचंड मेहनत करावी लागणार आहे. एवढेच नाही, तर मोदी सरकार भेदभाव न करता, सन्मानाने अल्पसंख्याकांना उभे करण्यासाठी कटिबद्द आहे, असे केंद्रीय अल्पसंख्याक मंत्री मुख्तार अब्बास नक्वी यांनी सांगितले.
मोदी सरकारने मुस्लिमांसाठी ज्या योजना सुरू केल्या, त्याची माहितीही मुस्लिमांना सांगितली जाणार आहे. त्याचबरोबर त्यांच्या विकासाबाबत आणि तिहेरी तलाकच्या मुद्यावरही केंद्र सरकारच्या प्रयत्नांची माहिती २०१९ मध्ये लोकसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान मुस्लिमांना दिली जाईल, असेही त्यांनी सांगितले. मुस्लीम समाजाच्या सशक्तिकरणासाठी केलेल्या कामांमुळेच तर मुस्लीम मुलींतील शाळा सोडण्याचे प्रमाण ७४ टक्क्यांहून ४२ टक्क्यांवर आले आहे. सरकारने अनेक क्षेत्रात रोजगार उपलब्ध करून दिला आहे. याचा फायदा गरिबांबरोबरच अल्पसंख्याक समाजातील लोकांनाही झाला आहे.
कैराना पोटनिवडणुकीतील पराभवामुळे आम्हाला काहीही फरक पडणार नाही. मात्र तरीही लोकसभा निवडणुकीच्या दृष्टीने आम्हाला तयारी करावीच लागणार आहे. आता यापुढे आम्ही सर्वच निवडणुकांत पराभूत होऊ, असा अर्थ कैरानातील पराभवाचा होत नाही. तसेच काँग्रेस आणि इतर विरोधी पक्ष मुस्लिमांचा केवळ ‘व्होट बँक’ म्हणूनच वापर करतात, असेही नक्वी यावेळी बोलताना म्हणाले.