कॉन्टेक्ट ट्रेसिंग वाढवा, मृत्यूदर नियंत्रणात आणा

0

नूतन जिल्हाधिकारी अभिजीत राऊत : भुसावळात अधिकार्‍यांची घेतली बैठक, कंटेन्मेंट झोनसह रुग्णालयांची केली पाहणी

भुसावळ : कोरोनावर नियंत्रण मिळवण्यासाठी जास्तीत-जास्त रुग्णांचे स्वॅब घ्यावेत तसेच निगेटीव्ह अहवाल आलेल्या रुग्णांना तातडीने डिस्चार्ज द्यावा, अशा सूचना नूतन जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी बुधवारी येथे दिल्या. शहरात वाढत्या रुग्णांच्या पार्श्‍वभूमीवर जिल्हाधिकार्‍यांनी भुसावळात भेट दिली. कोविड सेंटरसह रुग्णालयांना त्यांना भेटी दिल्या तसेच कंन्टमेंट झोनची त्यांनी पाहणी करून अधिकार्‍यांची प्रांताधिकारी कार्यालयात बैठक घेतली.

सर्वेक्षण करण्याच्या सूचना
प्रांताधिकारी कार्यालयात झालेल्या बैठकीत जिल्हाधिकारी म्हणाले की, कॉन्टेक्ट ट्रेसिंग वाढवण्याची गरज असून जास्तीत-जास्त दोन दिवसात रुग्णांचा तपासणी अहवाल प्राप्त होईल, अशी व्यवस्था आता केली जात आहे. मृत्यूदर नियंत्रणात आणावा तसेच आरोग्य विभागाने शहरात सर्वेक्षण करावे तसेच संशयीत रुग्णांची माहिती काढावी, अशा सूचना त्यांनी केल्या. पालिकेच्या मुख्याधिकार्‍यांना शहरात स्वच्छता मोहिम राबवण्याच्या त्यांनी सूचना केल्या. याप्रसंगी डॉ.बाबासाहेब आंबेडकर वस्तीगृह, जवाहर नवोदय कोविड केअर सेंटर, रेल्वे रुग्णालयाला जिल्हाधिकार्‍यांनी भेट दिली तसेच सोयी-सुविधांचा आढावा जाणून घेतला तसेच भोई नगर व बद्री प्लॉट कंटेन्मेंट झोनचीही त्यांनी पाहणी केली.

यांची बैठकीला उपस्थिती
बैठकीला प्रांताधिकारी रामसिंग सुलाणे, तहसीलदार दीपक धीवरे, डीवायएसपी गजानन राठोड, बाजारपेठ पोलिस निरीक्षक दिलीप भागवत, शहर निरीक्षक बाबासाहेब ठोंबे, तालुक्याचे निरीक्षक चंद्रकांत कुंभार, प्रभारी मुख्याधिकारी अविनाश गांगुर्डे, नगरपालिकेच्या वैद्यकीय अधिकारी डॉ.किर्ती फलटणकर, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ.संगीता दवंगे आदींची उपस्थिती होती.