कॉपी करू न दिल्यामुळेच त्या विद्यार्थीनीची खोटी तक्रार

0

शाळा प्रशासनाने आरोप फोटाळला ः आ. निलम गोर्‍हेंची प्रशासनावर कारवाईची मागणी

पुणे :- लोणी काळभोर येथील एमआयटी संस्थेच्या एका नामांकित शाळेत परीक्षेच्या दिवशी कॉपी असल्याच्या संशयामुळे बारावीतील मुलींची कपडे काढून तपासणी केल्याचा प्रकार घडला होता. या प्रकरणी आता शाळा प्रशासनाने खुलासा केला असून तक्रार करणा-या विद्यार्थीनीला कॉपी करू न दिल्यामुळेच तिने खोट्या तक्रारी देऊन, संस्थेला नाहक बदनाम केल्याचे त्यामध्ये म्हटले आहे. दरम्यान आमदार निलम गोर्‍हे यांनी संमधीत मुलीची भेट घेऊन विचारपूस केली संमधीतांवर गुन्हे दाखल करण्याची मागणी केली.

संस्थेच्या बदनामीचे प्रयत्न
एमआयटी महाविद्यालयाच्या या परीक्षा केंद्रावर सुमारे 260 विद्यार्थ्यांमध्ये 90 विद्यार्थीनी परीक्षा देत आहेत. या परीक्षा केंद्रावर उच्च माध्यमिक केंद्राच्या नियमांचे काटेकोर पालन करून, त्यांच्या देखरेखीखाली परीक्षा घेतल्या जात आहेत. असे असताना देखील सदरील विद्यार्थीनीने तिला कॉपी न करू दिल्यामुळे, त्याचा राग मनात धरून, विद्यार्थीनीने व तिच्या पालकांनी खोट्या व विपर्यस्त तक्रारी देऊन, संस्थेला नाहक बदनाम करण्याचे प्रयत्न चालवले आहेत असे शाळा प्रशासनाने म्हणले आहे.

बोर्डाच्या नियमानूसार विद्यार्थ्यांची तपासणी
विद्यार्थ्यांनी कॉपी करू नये याकरिता सर्वच परीक्षा केंद्रांवर विद्यार्थ्यांकरिता पुरुष कर्मचारी आणि विद्यार्थीनींच्या तपासणीकरिता त्या त्या संस्थांच्या महिला कर्मचारी, माध्यमिक शिक्षण मंडळाने नेमलेल्या होमगार्ड विभागाच्या महिला कर्मचारी उपस्थित असतात. परीक्षा सुरू होण्याच्या अगोदर 15 मिनिटात या सर्व विद्यार्थ्यांच्या बोर्डाच्या नियमानुसार तपासणी करून, त्यांना परीक्षा हॉलमध्ये सोडले जाते. या नियमांनुसारच, एमआयटीच्या लोणी काळभोर येथील परीक्षा केंद्रावरही सर्व विद्यार्थ्यांची तपासणी केली गेली. कुठल्याही प्रकारे विद्यार्थीनींची विवस्त्र करून संस्थेच्या महिला कर्मचार्‍यांनी तपासणी केलेली नाही. सदरील विद्यार्थीनीने संस्थेवर व संस्थेच्या कर्मचार्‍यावर जो आरोप केला आहे, तो धादांत खोटा असून मुलीने खोटी तक्रार केली आहे असे शाळा प्रशासनाने म्हणले आहे.

शाळा कर्मचार्‍यांना दमदाटी
एमआयटीच्या लोणी काळभोर येथील परीक्षा केंद्रावर बसणार्‍या काही विद्यार्थ्यांच्या पालकांनी, पाल्यांना कॉपी करू न दिल्यामुळे, संस्थेच्या प्राचार्य व इतर कर्मचार्‍यांना शिवीगाळ व जिवे मारण्याच्या धमक्याही दिल्या आहेत. काही पालकांनी सुरक्षा रक्षकांना खोटे बोलून, दमदाटी करून प्रांगणात प्रवेश करून प्राचार्य व कर्मचार्‍यांना जातिवाचक शिवीगाळ, जिवे मारण्याची धमकी व दमदाटी केली. याप्रकरणी लोणी काळभोरच्या प्राचार्य व इतर कर्मचार्यांनी रितसर तक्रार लोणी काळभोर पोलीस स्टेशनमध्ये दाखल केलेली आहे.

संबंधितांवर गुन्हे दाखल करा – आ. गोर्‍हे
लोणी काळभोर येथील गुरूकुल विद्यालयातील बारावी परीक्षेदरम्यान कॉपीवरून विद्यार्थिनीची आक्षेपार्ह तपासणी करणे अयोग्य आहे. या घटनेची राज्य सरकारने तातडीने दखल घ्यावी, उच्चस्तरीय समिती नेमून चौकशी करण्यात यावी आणि संबंधितांवर कडक कारवाई करण्याची मागणी आमदार निलम गोर्‍हे यांनी आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पत्राद्वारे केली.

गोर्‍हे यांनी संबधित मुलींची प्रत्यक्ष भेट घेऊन सर्व प्रकार जाणून घेण्याचा प्रयत्न केला. यावेळी या मुलींशी संवाद साधताना त्या मुलींच्या झालेल्या अन्यायाची हकीकत सांगितली. हा प्रकार अतिशय लज्जास्पद असून, या घटनेचा त्यांनी निषेध नोंदविला. वास्तविक अशा प्रकारे कोणालाच मुलीची शारीरिक तपासणी करण्याचा अधिकार नाही. फक्त बोर्डाच्या पथकालाच तपासणी करण्याचा अधिकार आहे, तरी देखील हे या संस्थेच्या कर्मचार्‍यांनी शारीरिक तपासणी केल्याचे गोर्‍हे यांचे म्हणणे आहे.

एमआयटीत कुठलाही गैरप्रकार घडलेला नाही. याउलट 21 तारखेला परीक्षा सुरु झाल्यापासून बोर्डाच्या भरारी पथकाकडून कॉप्या पकडण्यात आल्या. आमच्या नामांकित संस्थेच्या प्राचार्यांना काही पालकांकडून धमकी वजा फोन आलेत. कॉप्या करू द्याव्यात अन्यथा याचा परिणाम गंभीर होईल,अशी धमकी ते करीत होते. तसेच वेळ प्रसंगी तुमच्यावर हल्ला करू ते समजूही देणार नाही. त्या संदर्भात 22 तारखेला शिक्षण मंडळाकडे सिक्यूरिटीकरीता मागणीही करण्यात आली. कॉप्या करू न दिल्याने पालकांकडून नाहक बदनामी केली जात आहे. धादांत खोटे कृत्य घडल्याचे काही लोक सांगत आहेत.

-स्वाती कराड-चाटे
कार्यकारी संचालिका माईस एमआयटी