कोकणच्या आंब्याचे करावे ब्रॅन्ड मार्केटिंग

0

पेण । हिमाचल अ‍ॅपल, काश्मिरी अ‍ॅपल, नागपूरचे संत्री, महाबळेश्‍वरची स्ट्राबेरी, देवगडचा हापूसच्या धर्तीवर कोकणचा आंब्याचे ब्रॅन्ड मार्केटिंग करावे. शेतकर्‍यांनी बदलत्या काळात आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करावा आणि जास्तीत जास्त क्षेत्रफळ लागवडीखाली आणावे, असे आवाहन कोकण विभागाचे कृषी सहसंचालक विकास पाटील यांनी महाराष्ट्र राज्य आंबा उत्पादक संघ व महाराष्ट्र चेंबर ऑफ कामर्स यांच्या वतीने पेण येथे आयोजित कोकण विभागीय कृषी फलोत्पादन, सिंचन, मत्स्यव्यवसाय परिषदेत बोलताना केले. यावेळी व्यासपीठावर जिल्हा कृषी अधिकारी पांडुरंग शेळके, राज्य आंबा उत्पादक संघाचे चंद्रकांत मोकल, उपविभागीय कृषी अधिकारी शिगेदार, तालुका कृषी अधिकारी कदम, निंबाळकर, रोकडे आदी मान्यवर उपस्थित होते.

यावेळी पुढे बोलताना विकास पाटील म्हणाले की, आजकाल मजुर मिळत नसल्याने गटाच्या माध्यमातून शेतकरी एकत्र आले तर उत्पादनही वाढेल. तसेच भाडे तत्त्वावर जागा घेऊन शेती करता येते. त्यासाठी सबसिडीवर कर्ज पुरवठा शासनाकडून केला जातो. त्याचा लाभ घेतला पाहिजे, असे सांगून गटाला लक्षांकाची अट नाही. शासनाची मदत प्रत्येक व्यवसायाला आहे. नरेगा सारखी योजना सुरू असून भविष्यात फळ लागवड योजना येण्याची शक्यता आहे. कोकणचा आंबा हा ब्रॅन्ड आहे. त्यामुळे आंबा बागायतदारानी मँगोनेट प्रणालीमध्ये नोंद करावी त्याचा फायदा शेतकर्‍यांनी घेतला पाहिजे, तर आंब्याला हमी भाव नको हे सोनं आहे, नाहीतर उद्या उस, कापूस पिकासारखी परिस्थिती होईल असे सांगत शेतकर्‍यानी मार्केटिंग तंत्रज्ञानाचा अवलंब करत उत्पादनाचा दर्जा वाढवण्याची गरज बोलताना व्यक्त केली.

यावेळी आंबा उत्पादक संघाचे अध्यक्ष चंद्रकांत मोकल यांनी आंबा उत्पादकांसाठी स्थानिक बाजारपेठा सुरू करण्यासाठी शासनाने सहकार्य करण्याची मागणी केली तसेच शेतकर्‍यांच्या समस्या मांडल्या. जिल्हा कृषी अधिकारी पांडुरंग शेळके यांनी पडीक क्षेञ आंबा लागवडीखाली आणावे, तर एखाद वर्षी भाव कमी मिळाला तरी पीक सोडू नये ती तूट दुसर्‍या वर्षी भरुन निघते. इतर पिकांच्या तुलनेत आंब्याचा भाव वाढलेला दिसत नाही. त्यासाठी सर्वांनी संघटितपणे एकञ यायला हवे, तर तरुणानींही शेती उत्पादनात पुढे यायला हवे असे सांगून अलिबाग व रायगडचा आंबा अशी ओळख राहावी यासाठी शेतकर्‍यांनी प्रयत्न करण्याचे आवाहन केले. यावेळी तालुका कृषी अधिकारी कदम मॅडम, शंकर मोकल, जनार्दन गावंड, संदीप ठाकूर, डा. सुरेश म्हाञे, अनिल मोकल यांनीही आपले विचार व्यक्त केले. यावेळी कृषी क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केलेल्या शेतकर्‍यांचा मान्यवरांच्या हस्ते गौरव करण्यात आला.