मुंबई । कोकणातील कुणबी समाज एकवटला असून 2019 ची विधानसभा निवडणूक स्वबळावर लढवण्याचा नारा देण्यात आला आहे. तीस वर्षांपासून विधान सभेत समाजाला राजकीयदृष्ट्या प्रतिनिधित्व नाही. समाजाचे प्रश्न प्रलंबित आहेत, सर्वच राजकीय पक्षांनी कुणबी समाजाचा फक्त वापर करून घेतला. 70 टक्के असलेला कुणबी समाज हा एकसंघ नसल्याने नेहमीच उपेक्षित राहिला. त्यामुळेच समाजाला न्याय मिळवून देण्यासाठी निवडणुकीत उतरण्याचे समाजाच्या वतीने ठरविण्यात आले आहे. त्यानुसार कोकणात निवडणूक लढवण्यास इच्छुक कुणबी उमेदवारांनी ‘कुणबी राजकीय संघटन’ समितीकडे आपले अर्ज दाखल केले. कुणबी समाजाची दखल घ्यावीच लागेल अशी रणनीती आखण्यात आली आहे. उमेदवार आणि मतदार संघ यांची निश्चिती यावेळी करण्यात आली आहे.
कुणबी नेतृत्वाची उपस्थिती
कोकणातील गुहागर, चिपळूण, दापोली – मंडणगड, रत्नागिरी, राजापूर, महाड, श्रीवर्धन आणि ठाण्यातील दिवा व पालघर – नालासोपारा विधानसभा समोर ठेवून अत्यंत महत्त्वाची बैठक मुंबईत झाली. कुणबी राजकीय संघटन समितीचे मुख्य संयोजक कृष्णा कोबनाक, कुणबी समाजोन्नती संघ, मुंबई उपाध्यक्ष हरीचंद्र म्हातले, नवी मुंबई उपमहापौर अविनाश लाड, यांच्यासह कुणबी राजकीय नेतृत्व सुरेश भायजे, अनिल नवगणे, लमोहन गोरे, संदीप राजपुरे, उदय कठे, नंदकुमार मोहिते, अरविंद ठमके, अशोक करंजे, अॅड.मंगेश हुमणे आदी प्रमुख व कुणबी समाजोन्नती संघ पदाधिकारी व कार्यकारिणी सदस्य आणि सर्व उपस्थित सन्माननीय कुणबी नेतृत्व विविध संघ शाखा अध्यक्ष सरचिटणीस, शाखा युवा अध्यक्ष, सरचिटणीस, विविध राजकीय पक्षातील कुणबीनेतृत्व यावेळी उपस्थित होते.