कोकण आयुक्तांनी घेतला पदवीधर मतदारसंघ निवडणूकपूर्व आढावा

0

नवी मुंबई । मुंबई शिक्षक, मुंबई पदवीधर व कोकण विभाग पदवीधर या तीन विधानपरिषद मतदार संघाची द्विवार्षिक निवडणूक जाहीर झाली असून सोमवार 25 जून 2018 रोजी मतदान तर गुरुवार दि. 28 जून 2018 रोजी मतमोजणी होणार आहे. याबाबत कोकण विभागीय महसूल आयुक्त डॉ.जगदीश पाटील यांनी कोकण विभागातील जिल्हाधिकारी यांची निवडणूकपूर्व आढावा बैठक घेतली. यावेळी कोकण विभाग पदवीधर मतदारसंघाचे निवडणूक निरीक्षक तथा दुग्धविकास आयुक्त आर.आर.जाधव हे उपस्थित होते.

परवानग्या एकाच ठिकाणी उपलब्ध करून देण्यासाठी एक खिडकी कक्षाची स्थापना
डॉ. पाटील यांनी यावेळी निवडणूक आयोगाच्या नियमांचे काटेकोपरपणे पालन होईल, याकडे सर्व अधिकारी व कर्मचारी यांनी लक्ष द्यावे, असे निर्देश दिले. यावेळी आयुक्तांनी प्रत्येक जिल्हयातील निवडणूक कामकाजाबाबत सविस्तर आढावा घेऊन सूचना दिल्या. निवडणुकीतील उमेदवारांना निवडणूक विषयक विविध परवाने घेण्यासाठी अनेक ठिकाणी जावे लागते हे टाळण्यासाठी व उमेदवारांना आवश्यक असणा-या परवानग्या एकाच ठिकाणी उपलब्ध करून देण्यासाठी एक खिडकी कक्षाची स्थापना करावी. असे सांगितले. जाधव यांनी यावेळी निवडणूक शांततामय वातावरण व पारदर्शकपणे पार पाडण्यासाठी निवडणूक निर्णय अधिकारी, सहायक निवडणूक निर्णय अधिकारी व संबंधित सर्व अधिकारी, कर्मचार्‍यांनी समन्वयाने काम करावे अशा सूचना दिल्या.कोकण विभाग पदवीधर मतदारसंघ यामध्ये पालघर 16982, ठाणे-45834, रायगड-19918, रत्नागिरी-16222, सिंधुदुर्ग-5308 असे एकूण 104264 मतदार आहेत. मुंबई पदवीधर मतदारसंघ यामध्ये मुंबई उपनगर-52283, मुंबई शहर-18353 असे एकूण 70636 मतदार आहेत. मुंबई शिक्षक मतदारसंघ यामध्ये मुंबई उपनगर-8252, मुंबई शहर-1889 असे एकूण 10141 मतदार आहेत. निवडणुकीची मतमोजणी आगरी-कोळी भवन, सेक्टर-24, नेरुळ, नवी मुंबई येथे होणार आहे.याबैठकीस जिल्हाधिकारी, मुंबई शहर शिवाजी जोंधळे, जिल्हाधिकारी, मुंबई उपनगर-सचिन कुर्वे, जिल्हाधिकारी, ठाणे डॉ.महेंद्र कल्याणकर, जिल्हाधिकारी, रत्नागिरी प्रदीप पी., जिल्हाधिकारी सिंधुदुर्ग दिलीप पांढरपट्टे, मुख्य कार्यकारी अधिकारी, रायगड अभय यावलकर, उपआयुक्त (सामान्य प्रशासन) महेन्द्र वारभुवन, उपायुक्त (महसूल) सिध्दराम सालीमठ, उपायुक्त (करमणूक) शिवाजी कादबाने, उपायुक्त (पुरवठा) दिलीप गुट्टे, उपायुक्त (रोहयो) अशोक पाटील, उपायुक्त (पुनर्वसन) अरुण अभंग तसेच मुंबई शहर, मुंबई उपनगर, ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग व पालघर या जिल्ह्यातील अधिकारी उपस्थित होते.

मतदानाच्या वेळेत बदल
नवी मुंबई – भारत निवडणूक आयोगाकडील 13 जून 2018 रोजीच्या अधिसूचनेच्या अनुषंगाने मुंबई शिक्षक, मुंबई पदवीधर व कोकण विभाग पदवीधर या तीन विधानपरिषद मतदार संघाची द्विवार्षिक निवडणुकीकरिता मतदानाची वेळे 2 तसांनी वाढवली आहे. सोमवार दि. 25 जून 2018 रोजी मतदान होणार असून मतदानाची वेळ सकाळी 7.00 ते सायंकाळी 5.00 वाजेपर्यंत केली आहे. असे महेन्द्र वारभुवन, सहा. निवडणूक निर्णय अधिकारी, तथा उपायुक्त (सामान्य), कोकण विभाग यांनी प्रसिध्दी पत्रकान्वये कळविले आहे.