रत्नागिरी : पावसाळ्यात कोकण रेल्वे मार्गावरील वाहतूक सुरळीत चालावी, या दृष्टीने या मार्गावरून धावणार्या गाड्यांच्या वेळेत बदल करण्यात आला आहे. पावसाळ्यात कोकण रेल्वे मार्गावरून धावणार्या गाड्यांचा वेग मर्यादित ठेवण्यात येणार असल्याने 10 जूनपासून कोकण रेल्वे गाड्यांचा वेग मंदावणार आहे.
अतिवृष्टीच्या काळात कोकण मार्गावर ताशी 40 कि.मी.चा वेग ठेवण्याचे निर्देश लोकोपायलटना देण्यात आले आहेत. ज्या प्रवाशांनी पावसाळ्याच्या काळासाठी कोकण रेल्वेचे आरक्षण केले आहे, त्यांनी आरक्षण तिकिटावरील रेल्वेची सुटण्याची वेळ आताच तपासून पाहावी, असे आवाहन कोकण रेल्वेने केले आहे.
दुर्घटना टाळण्यासाठी उपाययोजना
अतिवृष्टीदरम्यान कोकण रेल्वे मार्गावर उद्भवणार्या नैसर्गिक अडचणींमुळे कोकण रेल्वे मार्ग ठप्प होत असतो. तुफानी अतिवृष्टीमुळे दरडी व जमिनी खचण्याच्या घटना घडत असतात. जमीन खचण्याच्या घटना रोखण्यासाठी विशेष उपाययोजना आखण्यात आल्या आहेत. कोणतीही दुर्घटना घडू नये, यासाठी अतिवृष्टी कालावधीत कोकण रेल्वे मार्गावरून धावणार्या रेल्वे गाड्यांचा वेग कमी करण्यात येणार आहे. कोकण मार्गावरून धावणार्या गाड्यांचा वेग मंदावणार असल्याने चाकरमान्यांना विलंबाच्या प्रवासाला सामोरे जावे लागणार आहे.
24 तास मान्सून गस्त
कोकण मार्गावर कोलाड ते ठोकूर दरम्यान 24 तास मान्सून गस्त सुरू राहणार आहे. यासाठी सुमारे 950 कर्मचारी तैनात करण्यात येणार आहेत. अतिसंवेदनशील ठिकाणी 24 तास गस्ती चौक्या उभारण्यात येणार आहेत. रत्नागिरी येथे आपत्कालीन उपयोगात येणार्या गाडीची उपलब्धता करण्यात येणार आहे. तसेच लोकोपायलट, रेल्वे स्थानकप्रमुख यांच्यासह अन्य अधिकार्यांना मोबाईल फोन देण्यात येणार आहेत. ज्या प्रवाशांनी आतापर्यंत पावसाळ्याच्या काळात आरक्षण केले आहे, त्यांना त्यांच्या बदलत्या रेल्वे वेळापत्रकाबाबत माहिती घ्यावी लागणार आहे.