धुळे – लॉकडाऊनमुळे राजस्थानमधील कोटा येथे महाराष्ट्रातील सुमारे दीड हजारांवर विद्यार्थी अडकले आहेत. या विद्यार्थ्यांना माघारी आणण्यासाठी महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या धुळे आगारातून ७० बसेस रवाना झाल्या आहेत. दोन दिवसांत या बस विद्यार्थ्यांना घेवून माघारी येतील.
लॉकडाऊनच्या काळात देशभरात संचारबंदी लागू असल्याने तसेच राज्यातही जिल्हाबंदी असल्याने कोणालाही पूर्वपरवानगीशिवाय परजिल्ह्यात जाता येत नाही. अशा परिस्थितीत परराज्यातून राज्यातील विद्यार्थ्यांना आणण्यासाठी राज्य शासनाने पुढाकार घेतला. यासाठी राज्याचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे, परिवहन मंत्री अनिल परब यांनी केंद्र शासन व राजस्थान सरकारशी चर्चा केल्यानंतर या विद्याथ्यार्र्ंचा महाराष्ट्रात परतण्यात मार्ग मोकळा झाला.
धुळे ते कोटा हे ६३० किलोमीटरचे अंतर आहे. त्यामुळे प्रत्येक बसवर दोन चालकांची नियुक्ती केली आहे. या चालकांना स्वसंरक्षणासाठी परिवहन महामंडळाने आवश्यक साहित्य उपलब्ध करुन दिले आहे. त्यात मास्क, सॅनिटायझरचा समावेश आहे. तत्पूर्वी सर्व बस सॅनिटायझ करण्यात आल्या. या बस मंदसौर, रतलाममार्गे कोटा (राजस्थान) येथे पोहोचतील. व त्यानंतर त्या राज्यातील विद्यार्थ्यांना धुळे येथे आणण्यात येईल. धुळे जिल्ह्याचे पालकमंत्री अब्दुल सत्तार यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हाधिकारी संजय यादव, महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या धुळे येथील विभाग नियंत्रक मनीषा सपकाळ यांनी आवश्यक ती पावले उचलून तातडीने ७० बसेस सॅनिटायझ करुन व बसेसमध्ये आवश्यक त्या सुविधा व वाहनचालकांसह रवाना केल्यात.