कोणत्याही नेत्याने पैसे टाकण्याचे आश्‍वासन दिले नव्हते

0

खासदार अमर साबळे यांचे पत्रकार परिषदेत स्पष्टीकरण

पिंपरी : लोकसभा निवडणुकीमध्ये भाजपच्या कोणत्याही नेत्याने जनतेला 15 लाख रुपये देण्याचे आश्‍वासन दिले नव्हते. मात्र, विरोधकांनी हे आश्‍वासन भाजपच्या गळी उतरविले आहे, असे वक्तव्य भाजपचे खासदार अमर साबळे यांनी केले. तसेच काँग्रेसचा वारंवार पराभव होत आहे. जनतेला त्यांच्यात विश्‍वास राहिला नसल्याने त्यांनी आजचा दिवस ‘विश्‍वासघात’ दिवस पाळला असल्याची टीकाही त्यांनी केली. मोदी सरकार दलितांच्या सुरक्षिततेसाठी कटिबद्ध असल्याचेही साबळे यांनी सांगितले. दरम्यान, मोदी सरकारच्या चार वर्षांच्या कामगिरीची वर्तमानपत्रात छापून आलेली माहितीच खासदार साबळे यांनी पत्रकार परिषदेत वाचून दाखविली. यावेळी भाजपचे शहराध्यक्ष व आमदार लक्ष्मण जगताप, महापौर नितीन काळजे अनुउपस्थित होते.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारचा चार वर्षांचा कालावधी शनिवारी पूर्ण होत आहे. या कालावधीमध्ये सरकारने राबविलेल्या योजनांची माहिती देण्यासाठी पिंपरीत घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी आमदार महेश लांडगे, राज्य लेखा समितीचे अध्यक्ष अ‍ॅड. सचिन पटवर्धन, उपमहापौर शैलजा मोरे, सभागृह नेते एकनाथ पवार, शहर प्रवक्ते अमोल थोरात, सदाशिव खाडे, उमा खापरे, महिला अध्यक्षा शैला मोळक, मोरेश्‍वर शेडगे, महेश कुलकर्णी, बाबू नायर, प्रमोद निसळ उपस्थित होते.

लोककल्याणकारी योजना राबविल्या
खासदार साबळे यांनी सांगितले की, मोदी सरकारने अनेक लोककल्याणकारी योजना राबिवल्या आहेत. या योजनांचा फायदा देशातील 22 कोटी गरिबांनी घेतला आहे. लोकाभिमुख सरकार कसे असावे, याचे उत्तम उदाहरण मोदी सरकार आहे यांचे आहे. पाच कोटीपेक्षा अधिक गरजू कुटुंबांना उज्वला योजनेअंतर्गत गॅस देण्यात आले. उच्च अर्थिक स्तरातील लोकांनी गॅस अनुदान सोडल्याने गॅसच्या किमती आटोक्यात आल्या आहेत. 2022 पर्यंत या देशातील कोणताही नागरिक झोपडपट्टीमध्ये राहणार नाही. या देशातील एक कोटी लोकांना घरे देण्यात आली आहेत. 10 कोटी कुटुंबांना 5 लाख रूपये पर्यंत औषधोपचार मिळणार आहे. नरेंद्र मोदी आणि त्यांच्या मंत्रीमंडळातील मंत्र्यावर भ्रष्टाचाराचे आरोप झालेले नाहीत.

पंतप्रधान आवासमुळे गरिबांना दिलासा
खासदार साबळे म्हणाले की, नरेंद्र मोदी पंतप्रधान झाल्यानंतर त्यांच्या कारकीर्दीत त्यांनी उद्योग, व्यापार आणि अर्थ व्यवस्थेबाबत मोठा कार्यक्रम हाती घेतल्याने या दोन्ही क्षेत्रांना आलेली मरगळ दूर झाली आहे. त्यानंतर काही वर्षे प्रलंबित असलेला वस्तू व सेवा कर मोदींनी आणला. त्यामुळे उद्योगक्षेत्राची परिस्थिती चांगल्या प्रकारे सुधारली आहे. गेल्या चार वर्षामध्ये पायाभूत सुविधांच्या कामांमध्ये मोठ्या प्रमाणात सुधारणा झाली आहे. विमानतळ, समुद्रीमार्ग याबरोबरच देशभरात विशेषकरून पूर्व भारतातील सातही राज्यात आणि अत्यंत दुर्गम भागात पायाभूत सुविधा निर्माण होत आहेत. तसेच केवळ प्रकल्प सुरू नसून प्रकल्पांसाठी देण्यात आलेला निधीदेखील मोठ्या प्रमाणात खर्च होत आहे. पंतप्रधान आवाससारख्या योजनांमुळे गरीब आणि सामान्य नगरिकांना मोठ्या प्रमाणात दिलासा मिळाला आहे.

पिंपरी-चिंचवड शहरामध्ये मेट्रो, स्मार्ट सिटी, डिजिटल इंडिया, दिव्यांगांना केंद्र शासनाची मदत, मुद्रा लोन, पंतप्रधान आवास योजने अंतर्गत गरिबांना परवडणारी घरे, विमा कवच, स्कील इंडियाद्वारे युवकांना प्रशिक्षण, खेळाडूसाठी अर्थसहाय्य, जन धन आणि जन सुरक्षा, स्वच्छ भारत योजना, मागासवर्गीय शिष्यवृत्ती योजना, प्रधानमंत्री जन औषधी योजना, मिशन इंद्र्धनुष्यव्दारे मुलांचे लसीकरण, सुकन्या समृध्दी योजना, इत्यादी अनेक योजना केंद्र शासनाव्दारे पिंपरी-चिंचवड शहरामध्ये मोठ्या प्रमाणात राबविण्यात आल्या आहेत, असेही त्यांनी सांगितले.