दुबई:प्रदीर्घ कालावधीनंतर भारताच्या वन-डे संघात पदार्पण करणाऱ्या रविंद्र जाडेजाने पहिल्याच सामन्यात ४ बळी घेऊन आपण फॉर्मात असल्याचं दाखवून दिलं आहे. या कामगिरीसाठी जाडेजाला सामनावीराचा किताब देऊनही गौरवण्यात आलं. हा किताब स्विकारत असताना, रविंद्र जाडेजाने आपल्याला कोणालाही काहीही सिद्ध करुन दाखवण्याची गरज नसल्याचं म्हटलं आहे. हे पुनरागमन माझ्या नेहमी लक्षात राहिलं, कारण जवळपास ४८० दिवसांनंतर मी भारतीय वन-डे संघात परतलो आहे. याआधीही मी संघाबाहेर राहिलो आहे मात्र त्यावेळी कालावधी हा छोटा होता. माझ्या ताकदीवर माझा पूर्ण विश्वास आहे, त्यामुळे कोणालाही मला सिद्ध करुन दाखवायची गरज वाटत नाही. माझी फलंदाजी-गोलंदाजी अजुन चांगली करण्याकडे माझा भर राहिलं.” सामना संपल्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत जाडेजा बोलत होता.