कोथरूडमध्ये पूर्ववैमनस्यातून तरुणावर कोयत्याने वार

0

पुणे – कोथरूड परिसरातराहणाऱ्या तरुणावर त्याच्याच ओळखीच्या इसमांनी कोयत्याने वार करत जीवघेणा हल्ला केल्याचे समोर आले आहे. पूर्ववैमनस्यातून हा हल्ला करण्यात आल्याचे सांगण्यात येत असून याप्रकरणी कोथरूड पोलिसांनी दोघांना अटक केली आहे. तर, दोघे फरार आहेत. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सागर चंद्रकांत धावडे (वय २३, रा. शास्त्रीनगर, कोथरुड), या तरुणावर हल्ला झाला असून याप्रकरणी योगेश गोपीनाथ भूजबळ (वय २७, रा. कोथरुड गावठाण) व ओंकार श्याम फाटक (वय १८) या दोघांना अटक करण्यात आली आहे. तर, त्यांचे दोन साथीदार हल्ला केल्यानंतर फरार झाले आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,
जखमी तरुण सागर धावडे व योगेश भुजबळ एकमेकांना ओळखत असून यापूर्वी त्यांची भांडणे झाली आहेत. सागर याचा स्नॅक्स सेंटरचा हात गाडा आहे. तर, योगेश भूजबळ याचा भाजी विक्रीचा व्यवसाय आहे.

सागर धावडे हा रात्री दीड वाजण्याच्या सुमारास हॉटेल प्यासा येथून जेवणकरून घरी निघाला असता त्यावेळी योगेश भूजबळ व त्याच्या साथीदारांनी त्याला कोथरूड परिसरातील अत्रेय सोसायटीजवळ एकटे गाठले. तसेच, तू कोठे गेला होता, तुला माज चढलाआहे का? असे म्हणत शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. एवढ्यावरच न थांबता आरोपींनी त्याच्यावर कोयत्याने वार केले. यामध्ये त्याच्या मनगटावर व डोक्याला गंभीर मार लागला असून, त्याची प्रकृती चिंतानजक आहे.

दरम्यान, घटनेची माहिती मिळताच सागर याला रुग्णालयात दाखल करण्यात आले. तसेच आरोपींचा शोध घेतला असता दोन आरोपी पोलिसांच्या हाती लागले. मात्र दोन आरोपी पोबारा करण्यात यशस्वी झाले असून त्यांचा कसून शोध घेण्यात येत आहे. याप्रकरणी अधिक तपास उपनिरीक्षक जोगदंड हे करत आहेत.