कोथळीचे ‘बालशौर्य’ अखेर गोरखपूरात गवसले

0

मुक्ताईनगर- बालशौर्य पुरस्कारामुळे संपूर्ण देशभरात चर्चेत आलेल्या कोथळी येथील निलेश भिल्ल सुरुवातीला घरातून तर दुसर्‍यांदा बर्‍हाणपूरच्या गुरूकुल आश्रमशाळेतून गतवर्षी 6 डिसेंबर रोजी पळाला होता. शिकारपूर पोलिसात निलेश हरवल्याची नोंद केल्यानंतर त्याचा शोध सुरू असताना महिनाभरापूर्वी त्याने आपल्या कुटुंबियांशी संवाद साधून गोरखपूरात राहत असल्याचे सांगितल्यानंतर त्यास दोन दिवसांपूर्वी ताब्यात घेण्यात आले. सुमारे सहा महिन्यांपेक्षा अधिक काळ बाहेर वास्तव्य केल्यानंतर निलेश आपल्या कुटुंबियांसोबत गुरुवारी दुपारी कोथळीत घरी परतला आहे.

दुसर्‍यांदा निलेश बेपत्ता
नदीपात्रात बुडत असलेल्या चिमुकल्याचे प्राण वाचवल्याने निलेशला बालशौर्य पुरस्काराने गौरव करण्यात आला होता. देशभरात तो चर्चेत आल्यानंतर वडिल रागावल्यानंतर लहान भाऊ गणपतसह घरातून 2017 मध्ये बेपत्ता झाल्यानंतर गोरखपूरच्या अनाथालयात आढळला होता. शैक्षणिक पुर्नवसनासाठी त्यास बर्‍हाणपूरात दाखल केल्यानंतर अंगाला प्रचंड खाज येत असल्याच्या कारणावरुन मित्र रागवत असल्याने नीलेशने बर्‍हाणपूर येथील आश्रमशाळेतून 6 डिसेंबर 2018 रोजी पलायन केले होते. कुटुंबियांशी संपर्क केल्यानंतर सोमवारी गोरखपू येथून त्यास ताब्यात घेण्यात आले. गुरूवारी दुपारी तीन वाजता निलेश कुटुंबियांसह कोथळीत दाखल झाला असून यापुढे बर्‍हाणपूरच्या आश्रमात पुढे शिक्षणासाठी जायचे की नाही, याचा निर्णय घेण्यासाठी नीलेशने मुख्याध्यापक सुरेश चौधरी यांना 15 दिवसांची मुदत मागितली आहे.