समतोल स्वयंसेवी संस्थेचा पुढाकार ; पुढील शिक्षण होणार बर्हाणपूरात
मुक्ताईनगर – राष्ट्रीय बाल शौर्य पुरस्कारामुळे देशभरात कोथळीचे नाव झळकले होते तर हा पुरस्कार पटकावणार्या नीलेश भिल्लवर शुभेच्छांचा वर्षाव झाला होता मात्र मध्यंतरी कौटुंबिक कारणातून घर सोडलेला निलेश भावासह हरवल्याने पोलीस यंत्रणांना घाम सुटला होता तर सुमारे वर्षभरानंतर नीलेश गवसल्यानंतर सर्वांनाच दिलासा मिळाला होता. या काळात नीलेशचे शिक्षण सुटल्याने त्याच्या भविष्यातील संगोपनासाठी जळगांव येथील केशव स्मृती प्रतिष्ठान अंतर्गत असलेल्या समतोल प्रकल्प या स्वयंसेवी संस्थेने पावले उचलली आहेत. याच संदर्भात निलेशच्या नवीन शैक्षणिक सत्रात त्याला मध्यप्रदेशातील बर्हाणपूर येथील श्री राम गोकुल आश्रम येथे रविवारी स्थलांतरित करण्यात आले.
बर्हाणपूरात बालशौर्याचे पुढील शिक्षण
प्रतिष्ठानतर्फे प्रकल्प प्रमुख सपना श्रीवास्तव या रविवार, 20 मे रोजी कोथळी येथे दाखल झाल्या. निलेश व त्याची आई सोबत त्यांनी निलेशची जिल्हा परीषद शाळा गाठली. येथे त्यांनी शाळा सोडण्याचा दाखला व अन्य कागदपत्रे घेतली आणि निलेश व त्याची आई सोबत बर्हाणपूरकडे रवाना झाले. निलेश हा कोथळी येथील जिल्हा परीषद मराठी शाळेत इयत्ता 7 व्या वर्गात शिकत होता त्याने परीक्षा दिली नव्हती मात्र आरटीई कायद्या अंतर्गत त्याला वरच्या वर्गात पाठविले गेले. आता तो बर्हाणपूर येथील गायत्री ट्रस्ट संचालित श्रीराम गोकुल आश्रमात पुढील शिक्षण घेईल.
15 जूनपासून नीलेशचे सुरू होणार शिक्षण
निलेशला निरोप देतांना कोथळी जि.प.शाळेचे मुख्याध्यापक लक्ष्मण कुरकुरे, शिक्षक श्यामकांत रुले, अनिल पवार उपस्थित होते तर श्यामकांत रुले हे निलेश सोबत बर्हाणपूर गेले आहेत. श्रीराम गुरुकुल आश्रम ,गायत्री परिवार रचनात्मक ट्रस्ट खडकोद, ता.जि.बर्हाणपूर (मध्यप्रदेश) येथे निलेश रेवाराम भिल या राष्ट्रीय बाल शौर्य पुरस्कार प्राप्त विद्यार्थ्याचा आठवीत प्रवेश निश्चित झाला. त्याचे संपूर्ण पालकत्व केशव स्मृती प्रतिष्ठान जळगांव संचलित समतोल प्रकल्प यांनी घेतले आहे. रविवारी संपूर्ण कागदपत्रांसह प्रकल्प प्रमुख श्रीमती सपना श्रीवास्तव व शाळेतील शिक्षक श्यामकांत रुले, निलेशची आई सुंदरबाई भिल हे सदर गुरुकुल आश्रमात जाऊन त्याचा प्रवेश निश्चित करून आलेत. सध्या उन्हाळी सुट्या असल्याने येत्या 15 जूनपासून तो तेथे शिकण्यास जाणार आहे.