कोपर्डी खटल्याची सुनावणी अंतिम टप्प्यात, तीन जणांची साक्ष बाकी

0

अहमदनगर : अहमदनगर जिल्ह्यातील कोपर्डी खटल्याच्या अंतिम टप्प्यातील सुनावणीला सुरुवात झाली असून सोमवारी तपास अधिकारी शिवाजी गवारे यांची महत्वपूर्ण साक्ष नोंदवण्यात आली. यावेळी घटनेचा तपशील, साक्षीदार, पंच आणि एफआयआर संदर्भात साक्ष झाली. तसेच पीडित मुलीच्या संदर्भातील विविध तपासण्यांवर सरतपासणी झाली. आतापर्यंत 27 साक्षीदारांच्या साक्ष झाल्या असून आता केवळ तीन साक्षीदार तपासले जाणार आहेत.

दरम्यान आरोपींवरील हल्ल्याच्या पार्श्‍वभूमीवर जिल्हा सत्र न्यायालयात कडेकोट बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. डीवायएसपीसह तब्बल 47 पोलीस अधिकारी आणि पोलीसांचे कडे करण्यात आाले होते. सुरक्षेच्या कारणास्तव पत्रकार, इतर वकिल आणि अनोळखी व्यक्तिंना सुनावणी कक्षात मनाई करण्यात आली होती. तसेच न्यायालयाच्या मुख्य प्रवेशद्वारात पहिल्यांदाच मेटल डिटेक्टर बसवण्यात आले आहे.

कोपर्डी प्रकरण
अहमदनगरमधील कर्जत तालुक्यातील कोपर्डी गावात 13 जुलै 2016 रोजी नराधमांनी अल्पवयीन मुलीवर बलात्कार करून तिची निर्घृण हत्या करण्यात आली होती. याप्रकरणी जितेंद्र शिंदे, संतोष भवाळ आणि नितीन भैलुमे या तिघांना संशयित आरोपी म्हणून अटक करण्यात आली होती. त्यांच्यावर बलात्कार आणि हत्येचा आरोप ठेवण्यात आला आहे.