कोपर्डी ते तपोवन एक्स्प्रेस व्हाया बोरिवली लोकल

0

आजही स्त्रीकडे भोगवस्तू किंवा खेळणं म्हणून पाहण्याची प्रवृत्ती बदललेली नाही. आजच्या काळात स्त्रियांनी प्रत्येक क्षेत्रात प्रगती करून पुरुषांनाही मागे टाकले असताना तिच्यामागची असुरक्षितता मात्र संपलेली नाही. आजूबाजूला घडणार्‍या अनेक घटनांवरून ही गोष्ट लक्षात येत आहे. उलट ही मनोविकृती वाढत चालली आहे की काय असाच समाज होऊन अंगावर सर्रकन काटा उभा राहत आहे. आज एकीकडे आपण महासत्ता होण्याची स्वप्नं पाहत आहोत तर दुसरीकडे निर्मितीमधील एक महत्त्वाचा घटक असलेल्या स्त्रीला मात्र पुरेशी सुरक्षितता देऊ शकलेलो नाही. यापूर्वी स्त्रियांवर चार भिंतींच्या आत अत्याचार होत होते. आता सार्वजनिक ठिकाणी नजरेने आणि विकृत चाळ्यांमधूनही ते होऊ लागले आहेत.वर्षभरापूर्वी कोपर्डीसारख्या गावांत एका निष्पाप मुलीवर बलात्कार होतो. माणुसकीला दिवसा ढवळ्या काळिमा फासणारी घटना घडली. यावेळी संपूर्ण महाराष्ट्र जागा झाला, मोर्चे निघाले. मात्र, या सार्‍या घटनांनी वर्षभरात काही फरक पडला का, एक प्रश्‍न आज विचारावासा वाटतोय. उलट आज परिस्थिती तर त्याहून वाईट झालेय. आता तर सार्वजनिक ठिकाणीही महिलांच्या अब्रूची लक्तरे वेशीवर टांगण्यापर्यंत मजल गेली आहे. स्त्री कितीही सुशिक्षित, उच्चपदस्थ असली तरी पुरुषी वर्चस्वाच्या मानसिकतेखाली ती अजूनही भोगवस्तू म्हणूनच पाहिली जाते. ही मानसिकता का बळावत चालली आहे, याचा विचार करणं अपरिहार्य ठरतंय.

मुंबईसारख्या गर्दीच्या ठिकाणी तर लोकलमधून प्रवास करताना अवतीभवतीच्या चोरट्या नजरा, किळसवाने स्पर्श या सर्वांचा सामना अनेक स्त्रियांना रोज करावा लागतो. हे सारं चित्र पाहिल्यानंतर माणसाचं माणूस म्हणून आवश्यक असणारे संस्कारच हळूहळू ढासळत आहेत, असं वाटत असल्याने पुरुषांची महिलांकडे पाहण्याची नजर जोपर्यंत सुधारत नाही तोपर्यंत महिलांची सुरक्षितता धोक्यातच राहणार आहे. चालत्या बससारख्या सार्वजनिक ठिकाणी कितीही सुरक्षितता राखण्यात आली तरी पुरुषांची मानसिकता साफ झाल्याशिवाय हे चित्र बदलणार नाही. जे डोळ्यांना चांगलं दिसतं ते ओरबाडून घेण्याची प्रवृत्ती लोकांत असते, किंबहुना त्यांच्यातील कमीपणामुळे ती तयार होत असते. या विकृत मानसिकतेला ओरबाडण्यासाठी स्त्री सहज मिळते आणि मग…. मोठ्या वयाच्या स्त्रियांप्रमाणेच कोवळ्या मुलींवरही बलात्कार होत आहेत. अशा गुन्ह्यांना लहान मुली सहज बळी पडतात. त्यांना कोणत्याही प्रकारचं संरक्षण नाही आणि त्यांच्याकडे गुन्हेगाराला प्रतिकार करण्याचं बळही नसतं. आपल्याकडे महिलांवरील अत्याचाराचे गुन्हे झाले की, जिच्याबाबतीत ते गुन्हे घडतात त्या पीडितेलाच गुन्हेगार ठरवले जाते. ही गोष्ट गुन्हेगारांनाही माहिती आहे. त्यामुळे बिनदिक्कतपणे असे गुन्हे करण्यास ते धजावतात. मुंबई रेल्वेने केलेल्या प्रकाराप्रमाणे तर काही जण हसण्यावारीही नेतात हे इथले दुर्दैव. मोठमोठ्या शहरात, ग्रामीण भागात आजही सहा महिन्यांच्या मुलीवर, शाळकरी मुलीवर ते अगदी वयस्कर महिलांवरही बलात्कार होत आहेत. फॅशन न करणार्‍या गरिबांच्या मुलीही असे सावज ठरतात. त्यांच्यावर होणार्‍या लैंगिक अत्याचारांचे प्रमाण मोठे आहे. अत्याचार, लैंगिक शोषण यासंदर्भातील प्रकरण न्यायालयात गेल्यानंतर तेथे ते महिनोमहिने पडून राहते. नंतर लोकांनाही त्याचा विसर पडायला लागतो. हे बदलण्यासाठी प्रयत्न होऊन लवकर निर्णय घेतले गेले पाहिजेत. दुर्दैवाने आज असे गुन्हे करणार्‍यांना भय वाटावं, अशी यंत्रणा आपल्याकडे अस्तित्वात नाही, पण ते करणे ही काळाची गरज आहे हे राजकारण्यांनी ही समजून घेणे गरजेचे आहे. उद्या समाजात वावरताना पाहणार्‍या दिसणार्‍या घटनांचा बळी आपल्याच घरात असेल, अशी वेळ येऊ नये त्यासाठी आपणच सावध व्हायला हवे. कारण जखमेवर वेळीच उपचार केले गेले नाहीत तर ती जखम बळावू शकते याचा तरी अंदाज समाजाने आता घ्यायला हवा.
सीमा महांगडे – मुंबई