लोणावळा शहर पोलिसांनी केली कारवाई
लोणावळा : लोणावळ्यातील जयचंद चौक येथे हातात भला मोठा कोयता घेऊन नागरिकांमध्ये दहशत माजविणार्या एका कुख्यात गुंडाच्या भाच्याला लोणावळा शहर पोलिसांनी मोठ्या शिताफीने जेरबंद करीत त्याच्या मुसक्या आवळल्या. अब्राल समीर खान (वय 23, रा. कोंढवा खुर्द, पुणे) असे या अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव असून त्याच्या विरोधात शस्त्र अधिनियम 1959 चे कलम 4(25) प्रमाणे आर्म ऍक्ट दाखल करण्यात आला आहे. कुख्यात गुंड सादिक बंगाली याचा अब्राल हा भाचा आहे. सोमवारी दुपारी 4 वाजण्याच्या सुमारास अब्राल हा जयचंद चौकात हातात कोयता घेऊन मोठमोठ्याने आरडाओरडा करीत ‘मी बंगालीचा भाचा आहे, आमचा कोणी नाद करायचा नाही, एक एकाला खल्लास करून टाकीन’ असे म्हणून दहशत निर्माण करीत होता. त्यामुळे तेथील व्यापार्यांनी आपापली दुकाने भितीपोटी बंद करून घेतली.
हे देखील वाचा
सीट खाली एक स्टीलचा चॉपर
यावेळी त्याठिकाणी फिक्स पॉईंट बंदोबस्ताला असणारे पोलीस हवालदार आर.कोळी व गोपनीय पोलीस एन.जे.कवडे यांनी पोलीस ठाण्यात फोन करून पोलीस कुमक मागवून घेतली. पो.उप.नि आय.जे.शेख व ठाणे अंमलदार एस.बी.शिंदे यांच्यासह हवालदार एम. अहिनवे, एस.देशमुख, एम.मोरे, आर.मदने, व्ही.मुंडे यांनी घटनास्थळी धाव घेतली. त्याठिकाणी दहशत करीत असलेल्या अब्राल याला मोठ्या शिताफीने जेरबंद केले. त्याचवेळी त्याच्याजवळ असलेल्या त्याच्या मालकीच्या मित्सुबिशी लान्सर (एम.एच. 04 बी.एन. 9289 ) ताब्यात घेऊन गाडीची झाडाझडती घेतली असता गाडीच्या मागच्या सीट खाली एक स्टीलचा चॉपर आढळून आला. याप्रकरणी लोणावळा शहरचे पोलीस निरीक्षक बी.आर.पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरु आहे.