कोरपावलीच्या तत्कालीन सरपंच सविता जावळे यांना सशर्त जामीन

0

यावल- तब्बल 21 दिवसांच्या तुरूंगवासानंतर कोरपावली (ता. यावल) येथील तत्कालीन सरपंच सविता संदिप जावळे यांना मंगळवारी भुसावळ येथील अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालयातून सशर्त जामीन मिळाला तर या गुन्ह्यातील दुसरा संशयीत ग्रामसेवक अद्यापही पसार आहे. तत्कालीन सरंपच सविता जावळे व ग्रामसेवक सुनील चिंतामण पाटील यांनी एप्रिल ते जून 2016 या कालावधीत 14 व्या वित्त आयोगाच्या निधीत 8 लाख 46 हजार 500 रूपयांचा अपहार केला होता तर 20 नोव्हेंबर 2017 रोजी यावल पोलिसात गुन्हा दाखल झाला होता. सरपंच जावळे यांना 11 जुलैला पोलिसांनी अटक केली होती. सुरुवातीला काही दिवस पोलिस कोठडी व नंतर त्यांना न्यायलयीन कोठडी सुनावण्यात आल्याने जावळे यांची जिल्हा कारागृहात रवानगी करण्यात आली होती. यावल न्यायालयाने त्यांचा जामीन नाकारला होता नंतर भुसावळ येथील अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालयाचे न्यायाधीश एस.पी.डोलारे यांच्यासमोर मंगळवारी जावळेंच्या जामीन अर्जावर अ‍ॅड. वसीम खान यांनी युक्तीवाद केला. त्यानुसार जावळे यांना 25 हजारांच्या जात मुचकल्यावर सशर्त जामीन देण्यात आला. दरम्यान, या गुन्ह्यातील संशयीत आरोपी ग्रामसेवक सुनील पाटील यांना अटक करण्यात पोलिसांना यश आलेले नाही. पाटील सध्या धरणगाव तालुक्यात कार्यरत असून त्यांचा कसून शोध घेतला जात आहे.