कोरपावलीच्या तरुण शेतकर्‍याचा विहिरीत पडल्याने मृत्यू

0

यावल- शेतातील विहिरीत पाय घसरून पडल्याने तालुक्यातील कोरपावली येथील एका 37 वर्षीय तरुण शेतकर्‍यांचा मृत्यू झाला. ही घटना रविवारी सकाळी साडे सात वाजेच्या सुमारास घडली तर तब्बल नऊ तासाच्या शोध मोहिमेनंतर विहिरीच्या खोल पाण्याचा उपसा करून मृतदेह काढण्यात आला. तुषार सुधाकर पाटील (37) असे मयताचे नाव आहे.

विहिरीत तोल गेल्याने मृत्यू
कोरपावली येथील रहिवासी तुषार सुधाकर पाटील हे रविवारी सकाळी आपल्या कोरवापली शिवारातील शेतात जात असताना रस्त्यावरच अर्जुन रामा माळी यांची शेतविहिर आहे. तेथून पिण्याच्या पाण्याची पाच लिटरच्या कॅनमध्ये पाणी भरण्याकरीता थांबले व विहिरीजवळ जाताना त्यांनी आपला मोबाईल व आपल्या जवळील साहित्य विहिरीच्या बाजूला ठेवून पाणी भरत असताना त्यांचा तोल जाऊन ते विहिरीत पडले. ही घटना लक्षात येतात नागरीकांनी गावात माहिती दिली. तत्काळ गावातून पोलीस पाटील कोरपावली दत्तात्रय पाटील व महेलखेडी पोलिस पाटील मधुकर पाटील तसेच बाजार समितीचे संचालक राकेश फेगडेंसह अनेक जणांनी शेतात धाव घेतली व विहिरीत पट्टीच्या पोहणार्‍या सावखेडासीम येथील बाबू तडवी यांना बोलावुन विहिरीत शोध सुरू केला मात्र विहिरीत खूप खोलवर पाणी असल्याने शोध घेणे कठीण जात होते. दरम्यान, या विहिरीच्या पाण्याचा उपसा करण्याचा निर्णय घेण्यात आला व तब्बल नऊ तास उपसा केल्यानंतर सांयकाळी साडेचार वाजेला विहिरीतून मृतदेह बाहेर काढण्यात आला. यावल ग्रामीण रुग्णालयात रात्री शवविच्छेदन करून रात्री उशीरा त्यांच्यावर कोरपावलीत शोकाकूल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. मयताच्या पश्चात वृद्ध आई, पत्नी व तीन वर्षाचा मुलगा असा परीवार आहे. यावल पोलिसात संजय पाटील यांनी दिलेल्या खबरीवरून अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. पुढील तपास पोलिस हवालदार शेखर तडवी करीत आहे.