सात दशकांपूर्वी घनघोर युद्धाअंती उत्तर व दक्षिण कोरिया वेगवेगळे झाले होते. त्यानंतर उत्तर कोरियाच्या कोणत्याही हुकूमशहाने कधी दक्षिण कोरियाच्या जमिनीवर पाय ठेवला नव्हता. त्यात तीन पिढ्या बर्बाद झाल्या. हे दोन्ही स्वतंत्र राष्ट्रे एकमेकांविरोधात युद्धखोरपणा करत होते. त्यातच उत्तर कोरियाच्या हुकूमशाहीने तर अमानुषतेचा कळस गाठल्याच्या बातम्या जगभर ऐकायला मिळत होत्या. काल उत्तर कोरियातील हुकूमशहाची तिसरी पिढी आणि तिचे नेतृत्व चाळीस पाऊले दक्षिण कोरियाच्या दिशेने चालले आणि गेल्या 65 वर्षांतील युद्धाची समाप्ती झाली. एकमेकांना विश्वासात घेऊन विचारविनिमय केला अन् तिसर्या बाह्यशक्तीला दोघांच्या वादाचा गैरफायदा घेऊ दिला नाही तर तुटलेली मनेदेखील जुळवता येतात, हे या कोरियन राष्ट्रप्रमुखांनी दाखवून दिले आहे. या आठवड्याच्या अखेरीस झालेल्या या ऐतिहासिक भेटीने जगाला सुखद धक्का दिला. शिवाय, गेली सात दशके सुरू असलेला रक्तपातही थांबला. एकीकडे, ही घटना घडत असताना, दुसरीकडे भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हेदेखील आपले शेजारी राष्ट्र चीनच्या औपचारिक भेटीवर गेले. एका युद्धातील पराभव, त्यानंतर पाकिस्तानच्या सांगण्यावरून सातत्याने भारताला आडवे जाणे आणि अलीकडेच उफाळलेला डोकलाम वाद यामुळे भारत व चीनमध्ये कमालीचे तणावपूर्ण संबंध निर्माण झाले आहेत. हा तणाव कमी करण्याचा प्रयत्न मोदींच्या या भेटीने झाला. खरे तर हे दोन राष्ट्र एकमेकांचे शत्रूच नाहीत. ते नैसर्गिक मित्र आहेत. गेली तीन हजार वर्षे या राष्ट्रांत व्यापारिक, सलोख्याचे आणि सांस्कृतिक नाते आहे. हे नाते एकाएकी तुटून पडणे शक्य नाही. जगाच्या एका कोपर्यात दुरावलेले कोरियन एकत्र येत होते, तर दुसर्या कोपर्यात दोन सख्खे शेजारी पुन्हा एकवेळ सलोख्याच्या संबंधाची वीण घट्ट करत होते. जो प्रयोग कोरियात झाला तोच प्रयोग भारत-पाकिस्ताननेदेखील सत्यात उतरावा, असे भारतीयांसह पाकमधील काही नागरिकांनादेखील वाटते आहे.
कोरियाच्या राष्ट्रप्रमुखांनी साडेसहा दशकांचे युद्ध संपुष्टात आणले. भारत व पाकमध्येदेखील गेल्या सहा दशकांपासून अघोषित युद्ध सुरू आहे. सीमारेषेवर दररोज रक्तपात होत आहे. दोन्हीही देशांनी एकमेकांच्या देशांत पोसलेल्या दहशतवादाने सर्वसामान्य नागरिकांचे रक्तपाट वाहत आहेत. गेल्या 6 दशकांच्या युद्धाची समाप्ती करण्याची घोषणा या दोन्ही देशांनी केली तर आशियाखंडात शांतता प्रस्थापित होण्यास वेळ लागणार नाही. नाहक जाणारे जीवही रोखता येतील. परंतु, त्यासाठी पुढाकार कोण घेणार? दोन्ही कोरियांना एकत्र आणण्यासाठी व त्यांच्यातील कटुता संपुष्टात आणून युद्धसमाप्ती करण्यासाठी चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग यांनी पुढाकार घेतला होता. जिनपिंग यांनीच उत्तर कोरियाचा हुकूमशहा किम जोंग उन याला अतिशय कुटनीतीने शांत केले. त्याला वास्तवाचे भान दिले आणि स्वतःचा अहंकार थुकून दक्षिण कोरियाशी चर्चा करण्यास भाग पाडले. त्यामुळे स्वतः किम जोंग हा दक्षिण कोरियाच्या भूमीत चालत गेला. आंतरकोरियाई शिखर परिषदेच्या माध्यमातून दोन्ही देशांच्या सीमारेषेवर शांतता प्रस्थापित करण्यासाठी त्यानेच पुढाकार घेतला आणि आज कोरिया शांत झाल्याचे हे जग पाहत आहे. असाच पुढाकार चीनने भारत व पाकिस्तानबाबतीत घेतला तर इतिहासाला कलाटणी मिळेल. एकाच राष्ट्राची फाळणी होऊन दोन कोरिया निर्माण झाले. तद्वतच एकाच हिंदुस्थानची फाळणी होऊन भारत व पाकिस्तान निर्माण झालेले आहेत. या दोन देशांदरम्यान तसा पाहिला तर वाद काहीच नाही. जो वाद आहे तो भूभागाचा आहे. काश्मीर व बलुचिस्तानच्या मुद्द्यावरून या दोन राष्ट्रांत वाद आहे. हा वाद सोडवण्यासाठी चीनने पुढाकार घेतला तर तो नक्कीच सोडवता येऊ शकतो.
जम्मू-काश्मीर हा भारताचा अविभाज्य भाग आहे, तर बलुचिस्तान हा पाकिस्तानचा अविभाज्य भाग आहे. ही वस्तुस्थिती जगातील कोणतीही सत्ता नाकारू शकत नाही. दोन देशातील वाद सोडवण्यासाठी पाकिस्तानने काश्मीरवरचा आपला हक्क सोडावा. पाकव्याप्त काश्मीरसह काश्मीर भारतात विलीनीकरणात आडकाठी आणू नये व स्वतंत्र काश्मीरची मागणी करणार्या दहशतवादी गटांना रसद पुरवण्याचे कामही थांबवावे. त्या बदल्यात भारतानेदेखील बलुचिस्तानी फुटीरतावाद्यांना लष्करी ताकद पुरवण्याचे काम थांबवावे. बलुचिस्तान हा पाकिस्तानचाच अविभाज्य भूभाग आहे, याला मान्यता द्यावी. हा राजकीय तोडगा निघाला तरच या दोन राष्ट्रांतील संबंध सलोख्याचे होतील. गेल्या साडेसहा दशकांचे युद्ध समाप्त होईल. भारत व पाकिस्तानला एकत्र आणून त्यांच्यात समेट घडवण्याची क्षमता केवळ चीनमध्ये आहे. तशी क्षमता जगातील अन्य कोणत्याही शक्तीमध्ये नाही, ही वस्तुस्थिती आहे. अमेरिका या दोन देशांतील तणाव कायम कसा राहील, हेच बघत आली आहे. कारण, हा तणाव कायम राहिला तरच त्यांची शस्त्रे विकली जातात. त्यातून त्यांना भरमसाठ पैसा मिळत असतो. त्यामुळे भारत व पाकिस्तानातील तणाव दूर व्हावा, सख्खे शेजारी म्हणून या दोन राष्ट्रांत मैत्रिपूर्ण संबंध असावेत, असा विचार अमेरिका करणे शक्य नाही. उलट या दोन देशातील तणावात तेल ओतण्याचे काम ते सातत्याने करत आले आहेत. तेव्हा भारत व पाकिस्तानला एकत्र आणून आशियातील तणाव दूर करण्यात चीन महत्त्वपूर्ण भूमिका बजावू शकतो. दोन युद्धखोर कोरियन नेत्यांना एकत्र आणणे चीनला शक्य होते तर भारत व पाकिस्तानला एकत्र आणणे त्यांच्यासाठी अशक्य आहे का?
भारताला शेजारी राष्ट्रांशी मैत्रीचे संबंध हवे आहेत. मग ते पाकिस्तान असो किंवा चीन असो. अथवा नेपाळ असोत की श्रीलंका, वा बांगलादेश. या राष्ट्रांशी चांगले संबंध प्रस्थापित करण्यासाठी स्व. पंडित जवाहरलाल नेहरू ते नरेंद्र मोदी या प्रत्येक भारतीय पंतप्रधानांनी जोरकस प्रयत्न केले आहेत. कालच नरेंद्र मोदी हे औपचारिकरीत्या चीनच्या दौर्यावर गेले होते. काहीही कारण नसताना चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांच्याशी आपसी चर्चा करण्यासाठी मोदी चीनमध्ये गेले. गेल्याच वर्षी डोकलाम प्रश्नावरून भारत व चीनमध्ये तणाव निर्माण झाला होता. हा तणाव दूर करण्यात मोदी यांना या भेटीने काहीअंशी यश आलेे. वास्तविक पाहता, गेल्या तीन हजार वर्षांपासून भारत व चीनचे व्यापारिक, सांस्कृतिक आणि आर्थिक, राजकीय संबंध आहेत. जगाच्या एकूण लोकसंख्येच्या 40 टक्के लोकसंख्या ही भारत व चीनमध्ये राहते, तर एकूण अर्थव्यवस्थेच्या 60 टक्के अर्थव्यवस्था ही या दोन राष्ट्रांच्या हातात आहे. त्यामुळे भारत व चीन व्यापारउदिम, संशोधन, तंत्रज्ञान आणि संरक्षण या क्षेत्रात एकत्र आले तर दोघेही झपाट्याने विकसित अर्थव्यवस्था बनू शकतात. तेव्हा हे दोन राष्ट्रे एकत्र यावेत, यासाठी राजकीय पातळीवर सातत्याने प्रयत्न करण्यात येत असतात. कधी पाकिस्तान, सीमाक्षेत्र तर कधी नद्यांचे पाणी या किरकोळ प्रश्नांवरून या प्रयत्नांना हरताळ फासली जात असते. आशियामध्ये आपलेच वर्चस्व असावे, असे या दोन्हीही सख्ख्या शेजार्यांना वाटत राहते. त्यामुळे दोघांनीही आर्थिक कॉरिडोर निर्माण करण्याचा प्रयत्न करून आपली ताकद बळकट करण्याचा प्रयत्न केला तसेच काही गरीब राष्ट्रांना पैसा व लष्करी साहाय्य देऊनदेखील अंकित करण्याचा प्रयत्न झाला. हा वर्चस्ववाद सोडला तर दोघांनाही एकमेकांशी व्यापार-उदिमाशिवाय पर्याय नाही. भारत व चीन हे एकमेकांची गरज आहे, या दोघांतील सौहार्दपूर्ण संबंध कोणत्याही परिस्थितीत संपुष्टात येणारे नाहीत. कारण, ते आर्थिक व सांस्कृतिक पायांवर भरभक्कमपणे उभे आहेत. काल नरेंद्र मोदींंचे राजशिष्टाचार बाजूला सारून शी जिनपिंग यांनी स्वागत केले, असेच स्वागत यापूर्वी भारताचे पंतप्रधान राजीव गांधी यांचे 1988 मध्ये चीनचे तत्कालीन शासनप्रमुख देंग श्याओ पिंग यांनी केले होते. याच मैत्रीचा नवा अध्याय मोदींनी सुरू केला आहे. मोदीनंतर येणारे कोणतेही नेतृत्व या पायवाटेपलीकडे जाणार नाहीत. कारण, चीनसोबत पंचशील संबंधांची मुहूर्तमेढच पंडित जवाहरलाल नेहरू यांनी रोवलेली आहे. द्विराष्ट्रसंबंधाची ही पायाभरणी भारतीय नेतृत्वासाठी नेहमीच दीपस्तंभासमान राहिली आहे. मने तुटलेली राष्ट्रे जगाच्या वेगवेगळ्या कोपर्यात एकत्र येऊ लागली आहेत, ही जागतिक शांततेसाठी आनंदाची बातमी म्हणावी लागेल. तिकडे कोरियन नेतृत्व एकत्र आले. आशियातील दोन महासत्ता एकत्र बसून चर्चा करू लागल्या. भारत व पाकिस्तान या दोन सख्ख्या शेजारी राष्ट्रांमध्येही आपसी मतभेद दूर करणारी अशीच एखादी आंतर शिखर परिषद झाली, तर जगासाठी ती बाबदेखील सुखद धक्का देणारी असेल.
मैत्रीचे नवे धागेदोरे…
उत्तर कोरियाचा हुकूमशहा हा दक्षिण कोरियाच्या भूमीत चालत जाऊन गेली साडेसहा दशके सुरू असलेले कोरियन युद्ध समाप्त झाल्याची घोषणा करू शकतो, तर सीमारेषेवर व सीमारेषेच्या आतदेखील गेली सहा दशके रक्तपात घडवणारे भारत व पाकिस्तान हे दोन सख्खे शेजारी राष्ट्रे असे पाऊल का उचलू शकत नाही? काश्मीर व बलुचिस्तान हे दोन प्रांतच या दोन राष्ट्रांतील वादाची मूळ कारणे आहेत. भारताने बलुचिस्तानावरील दावा सोडावा अन् पाकिस्तानने काश्मीरवरील दावा सोडावा. असे झाले तर दहशतवाद, रक्तपात आणि युद्धे आपोआप थांबतील. कोरियाने राष्ट्रप्रमुखांची मने जुळवण्यासाठी चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग यांनी पुढाकार घेतला होता. त्यात ते यशस्वी झालेत. भारत आणि पाकिस्तान यांची दुरावलेली मने जुळवण्यासाठीदेखील जिनपिंग यांनीच पुढाकार घ्यावा. कारण ते काम अमेरिका करणे शक्य नाही. भारत-पाकमधील तणाव निवळला तर अमेरिकेची शस्त्रे कोण घेणार? त्यामुळेच चीननेच पुढाकार घ्यायला हवा. भारत व पाकिस्तानने युद्धबंदीची घोषणा केली, तर आशिया खंडात शांतता प्रस्थापित होईल.
– पुरुषोत्तम सांगळे
निवासी संपादक, जनशक्ति, पुणे
8087861982