कोरेगाव भीमा हिंसाचारातील आरोपींना प्रवेशबंदी – अधीक्षक संदीप पाटील

0

पुणे : कोरेगाव भीमा हिंसाचार प्रकरणाशी संबंध असणार्‍या आरोपींना पुणे ग्रामीण हद्दीत प्रवेशबंदी करण्यात आली असून दोन दिवसांपूर्वी या संदर्भातील आदेश काढण्यात आले असल्याची माहिती पुणे ग्रामीणचे अधीक्षक संदीप पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली.

अधीक्षक संदीप पाटील म्हणाले की, कोरेगाव भीमा येथे चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला असून संपूर्ण १० किलोमीटरचा परिसरावर सीसीटीव्हीची नजर आहे. याठिकाणी येणार्‍या प्रत्येक नागरिकांची काळजी घेतली जाणार असल्याचे त्यांनी सांगितले. पुणे जिल्ह्यातील भीमा कोरेगाव येथे १ जानेवारी २०१८ रोजी झालेल्या हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर यंदा होणार्‍या कार्यक्रमाच्या तयारीचा आढावा घेण्यासाठी सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले, पालकमंत्री गिरीश बापट, जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांच्यासह अधिकारी उपस्थित होते.

राजकुमार बडोले म्हणाले की, भीमा कोरेगाव येथे यंदा १ जानेवारी रोजी विजयस्तंभास अभिवादन करण्यास येणार्‍या नागरिकांची संख्या ८ ते १० लाख असणार आहे. त्या दृष्टीने सर्व सुविधा पुरवल्या जाणार असून चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. येणार्‍या प्रत्येक नागरिकाला पाणी व गाडीची सुविधा दिली जाणार आहे. तसेच नागरिकांनी सोशल मीडिया वरील कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नका असे आवाहन देखील बडोले यांनी केले आहे.