वरखेडी:- येथून जवळ असलेल्या लोहारी बु. ग्रा.पं सरपंच सिमा पाटील, ग्रामविकास अधिकारी डी. एन. मोरे यांच्यासह सदस्य व कर्मचाऱ्यांनी कोरोनाशी लढण्यासाठी कंबर कसली आहे. ग्रा.पं. तर्फे विविध उपाययोजना करण्यात आल्या आहेत. लोहारी बु. ग्रामपंचायती अंतर्गत लोहारी बु. लोहारी खु., आर्वे, इंदिरा नगर, दत्तनगर इ. महसूली गावे व वाड्या वस्त्यांचा समावेश आहे.
कोरोनाची चाहूल लागल्यापासून ग्रामपंचायतीने विविध उपाययोजना केल्या आहेत. सर्व महसूली गावे व वाड्या वस्त्यांमध्ये रोगप्रतिबंधक औषधाची फवारणी करण्यात आली आहे. गावांमध्ये नाले सफाई, पाईपलाईन लिकेज, वॉल गळती वेळीच काढून तिन्ही गावांमध्ये टीसीएलयुक्त शुध्द पाणीपुरवठा करण्यात येत आहे. त्याचबरोबर कोरोना विषाणूबाबत ग्रामस्थांना माहिती साठी ठिकठिकाणी पोस्टर्स व बॕनर्स लावण्यात आलेले आहेत.
तसेच बाहेरगावाहून आलेल्या लोकांना होम क्वारनटाईनचा सल्ला देऊन लक्ष दिले जात आहे. कोरोना आपत्ती व्यवस्थापन समित्या स्थापन करण्यात आलेल्या आहेत.