साध्या पद्धत्तीने सण साजरा : वाहन, सोने, इलेक्ट्रॉनिक्स बाजाराला फटका
भुसावळ (गणेश वाघ) : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यात संचारबंदी तसेच जमावबंदीचे आदेश प्रशासनाने दिल्यानंतर देशातही लॉकडाऊनचे आदेश देण्यात आले आहेत. त्यातच मराठी नववर्ष सण बुधवार, 25 मार्च रोजी आल्याने अत्यंत साध्या पद्धत्तीने शहरात हा सण साजरा करण्यात आला. सकाळी सहा ते दहा या वेळेत प्रशासनाने मुदत दिल्याने जीवनावश्यक वस्तूंसह गोड-धोड पदार्थ खरेदीसाठी नागरीकांची शहरात गर्दी झाली होती. दरम्यान, एरव्ही सणाला वाहन बाजारासह इलेक्ट्रॉनिक्स वस्तू तसेच सोने बाजारात ग्राहकांची वर्दळ राहत असलीतरी संचारबंदीमुळे बाजारपेठ बंद असल्याने सुमारे तीन कोटींचा फटका व्यावसायीकांना बसल्याचा अंदाज आहे.
व्यावसायीकांना तीन कोटींचा फटका
साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या गुढीपाडव्यासह मराठी नववर्षाला नवीन वस्तू हमखास मराठी बांधव घेतात. यानिमित्त भुसावळातील इलेक्ट्रॉनिक्स दुकानांसह चारचाकी तसेच दुचाकी व सोने खरेदी तसेच कपडे खरेदीच्या माध्यमातून मोठी उलाढाल होते मात्र कोरोनामुळे व्यावसायीकांना दुकाने बंद ठेवण्याचे आदेश प्रशासनाने दिल्याने एकूणच सर्वच व्यावसायीकांचा विचार केल्यास सुमारे तीन कोटी व त्यापेक्षा अधिक फटका सर्व व्यावसायीकांना बसल्याचा अंदाज आहे.
यात्रोत्सवही करावा लागला रद्द
गुढीपाडव्याला शहरातील मरीमातेच्या बारागाड्या ओढण्याची व यात्रोतसवाची परंपरा असलीतरी गर्दी टाळण्यासाठी यात्रोत्सव व बारागाड्या रद्द करण्यात आल्या मात्र पारंपरीक पद्धत्तीने पूजा-अर्चा आटोपण्यात आली. यात्रोत्सवाच्या माध्यमातून हॉटेल्स, पाळणे तसेच अन्य छोट्या व्यावसायीकांना मोठा रोजगार उपलब्ध होत होता मात्र कोरोनामुळे हा रोजगारदेखील हिरावला गेला आहे.
400 किलो श्रीखंडाची विक्री
सणानिमित्त शहरात बुधवारी सकाळी सहा ते दहा दरम्यान नागरीकांनी दुध, श्रीखंड तसेच गोड-धोडे पदार्थांची खरेदी केली तसेच जीवनावश्यक वस्तूंचीदेखील खरेदी केली. या माध्यमातूनही मोठी उलाढाल झाली. शहरातील विविध भागातील डेअरीवरून सुमारे 300 ते 400 किलो श्रीखंडाची विक्री झाल्याचे सांगण्यात आले.