भुसावळ : शहरातील समता नगरासह सिंधी कॉलनीत कोरोना पॉझीटीव्ह रुग्ण आढळल्याची घटना विस्मरणात जात नाही तोच पुन्हा सोमवारी रात्री शहरातील तीन रुग्णांचा अहवाल पॉझीटीव्ह आल्याने खळबळ उडाली होती. त्यातील बाधीत दोघा रुग्णांचा मृत्यू झाला असून तिसरा रुग्ण मात्र शांती नगर भागातील डॉक्टर असल्याने प्रशासनाची चिंता वाढली आहे. या पार्श्वभूमीवर मंंगळवारी प्रशासनाने शहरातील शांती नगरासह पंचशील नगर व परीसरातील दिड किलोमीटरपर्यंतचा भाग सील केला आहे. नागरीकांना 14 दिवस आता घरातच कॉरंटाईन रहावे लागणार असून या भागात वैद्यकीय सुविधेव्यतिरीक्त अन्य वस्तूंची दुकाने बंद ठेवली जाणार आहे. दरम्यान, शहरातील तीनही भागातील बाधीत रुग्णाच्या संपर्कात आलेल्यांसह कुटुंबातील व्यक्ती मिळून 24 नागरीकांना जळगावात तपासणीसाठी हलवण्यात आले आहे.
24 नागरीकांना जळगावात तपासणीसाठी हलवले
सोमवारी आलेल्या अहवालात भुसावळातील दोघा मृतांसह शांती नगरात रहिवास करीत असलेल्या डॉक्टरांचा अहवाल पॉझीटीव्ह आला होता. या पार्श्वभूमीवर मंगळवारी प्रशासनाने पंचशील नगरातील मृत 65 वर्षीय महिलेच्या कुटुंबासह संपर्कात आलेल्या 11 लोकांना तसेच शांती नगरातील डॉक्टरांच्या सौभाग्यवतींसह त्यांच्या दोघा मुलांना तसेच समता नगरातील 82 वर्षीय मृताच्या कुटुंबातील सदस्यांसह शेजारच्या मिळून 11 लोकांना जळगावात तपासणीसाठी हलवले आहे. एकूण 24 नागरीकांना तपासणीसाठी हलवण्यात आल्याची माहिती नगरपालिकेच्या वैद्यकीय अधिकारी डॉ.किर्ती फलटणकर यांनी दिली.
आरोग्य विभागाकडून सर्वे सुरू
शहरातील समता नगर व सिंधी कॉलनीत यापूर्वीच कोरोना बाधीत रुग्ण आढळल्याने या परीसरात आरोग्य विभागाचा सर्वे सुरू आहे तर मंगळवारपासून पंचशील नगरासह शांती नगर परीसरात पालिकेच्या 34 टीमद्वारे सर्वे केला जात आहे. सर्दी, खोकला तसेच ताप येत असलेल्या नागरीकांच्या नोंदी पालिकेच्या पथकाकडे ठेवल्या जात असून उपाययोजनांबाबत औषधी दिली जात आहेत.
प्रशासनाच्या बैठकीत चिंतन
भुसावळात कोरोना बाधीतांची संख्या पाचवर पोहोचल्यानंतर प्रांताधिकारी रामसिंग सुलाणे यांनी मंगळवारी प्रशासनातील अधिकार्यांची बैठक घेतली. आमदार संजय सावकारे, पोलिस उपअधीक्षक गजानन राठोड, तहसीलदार दीपक धीवरे, मुख्याधिकारी करुण डहाळे, शहरातील तीनही पोलिस ठाण्यांचे निरीक्षक, वैद्यकीय अधिकारी डॉ.किर्ती फलटणकर तसेच पालिका अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. शहरातील चार भाग सील करण्यात आल्याने या भागातील नागरीकांना सुविधा पुरवण्याबाबत तसेच रुग्णांची संख्या वाढल्यास त्याबाबत करावयाच्या उपाययोजनांबाबत बैठकीत चर्चा करण्यात आली.
नागरीकांनी घरातच थांबावे : प्रांताधिकारी
शहरातील चार भाग सील करण्यात आले असून नागरीकांना घराबाहेर निघण्यास बंदी करण्यात आली आहे. आतातरी नागरीकांनी घरातच थांबावे, असे आवाहन प्रांताधिकारी रामसिंग सुलाणे यांनी केले आहे. 14 दिवस वैद्यकीय सेवा वगळता सर्व सेवा सील केलेल्या भागात बंद करण्यात आल्या असून अत्यावश्यक गरजेच्या वेळी लागणार्या वस्तू नागरीकांना देण्यासाठी नगरपालिकेने प्लॅन तयार केला असून स्वयंसेवकांमार्फत या वस्तू नागरीकांना पोहोचवल्या जाणार असल्याचेही प्रांत म्हणाले.
पंचशील नगरासह शांती नगराचा भाग सील
मंगळवारी डीवायएसपी गजानन राठोड, शहर निरीक्षक बाबासाहेब ठोंबे, बाजारपेठ निरीक्षक दिलीप भागवत यांनी शांती नगर परीसराची पाहणी करीत हा परीसर सील करण्याबाबत भाजपा संघटन सरचिटणीस प्रा.सुनील नेवे, नगरसेवक प्रमोद नेमाडे, अमोल इंगळे, गिरीश महाजन आदींशी चर्चा करीत त्यांना सहकार्य करण्याचे आवाहन केले. पंचशील नगराचा परीसरही सील करण्या आला असून गंगाराम प्लॉटचा परीसरात जाण्यासाठी आता अष्टभूजा मंदिरापासून एकच दरवाजा राहणार असून त्यासाठी राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष नितीन धांडे यांनी स्व-खर्चाने हे काम केले आहे.
आमदारांनी केली शहर लॉकडाऊनची मागणी
भुसावळ शहरात वाढत असलेल्या कोरोनाचा फैलाव पाहता आमदार संजय सावकारे यांनी संपूर्ण शहर बंद करण्याची मागणी प्रांताधिकारी रामसिंग सुलाणे यांच्याकडे केली आहे. या संदर्भात जिल्हाधिकार्यांचे मार्गदर्शन मागवून पुढील निर्णय घेण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले.