20 आशा स्वयंसेविका, 32 अंगणवाडी सेविका होत्या उपस्थित
जामनेर:- कोरोना आजाराची साथ मोठ्या प्रमाणात वाढत असून, भविष्यात रुग्णांची संख्या वाढण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर प्रतिबंधात्मक व उपचारात्मक, आरोग्य विभागातील व खाजगी वैद्यकीय सेवेतील मनुष्यबळ कमी पडण्याची शक्यता आहे. अशा परिस्थितीत पर्यायी व्यवस्था निर्माण करण्याचा दृष्टीने जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार २० आशा स्वयंसेविका व ३२ अंगणवाडी सेविका यांना आपत्ती व्यवस्थापन नियंत्रण,उपचार याबाबत तालुका आरोग्य अधिकारी डॉ.राजेश सोनवणे यांच्याकडून व बालविकास प्रकल्प अधिकारी आय.सी.गोयल यांच्याकडून प्रशिक्षण देण्यात आले.
20 आशा, 32 अंगणवाडी सेविकांनी घेतले प्रशिक्षण
पंचायत समिती गटविकास अधिकारी डी.एस.लोखंडे यांच्या अध्यक्षतेखाली प्रशिक्षणाचे नुकतेच आयोजन करण्यात आले होते. देशभरात लॉक डाऊन असतांना ये जा करण्यास कोणतेही वाहन उपलब्ध नसतांना सदर प्रशिक्षणास २० आशा व ३२ अंगणवाडी सेविका उपस्थित होत्या.
- जनजागृतीपर पत्रके वितरीत
प्रशिक्षणार्थ्यास मास्क, पोस्टर,
महितीपुस्तिका तसेच जनजागृती पत्रके वाटप करण्यात आले. प्रशिक्षणामध्ये रुग्ण संख्या वाढल्यास आशा व अंगणवाडी सेविका यांना नर्सिंग स्टाफ म्हणून काम करायचे आहे. त्यामुळे कोरोना आजार काय आहे त्याची लक्षणे, उपचार, स्वतःची घ्यावयाची काळजी, पी.पी.ई. कसे घालायचे कसे काढायचे त्याची विल्हेवाट कशी लावावी व ग्राम पातळीवर सरपंच,पोलिस पाटील,ग्रामसेवक, तलाठी यांच्या मदतीने नागरिकांची जनजागृती व समुपदेशन कसे करावे. या विषयी सविस्तर माहिती सांगण्यात आली. मारबशीर पिंजारी ,आशा कुयटे, नरेंद्र तंवरत,राजू माळी यांचे प्रशिक्षणास सहकार्य लाभले.