कोरोनाच्या संकटात योध्दा बनुन लढणाऱ्यांना प्रोत्साहन भत्ता द्या

0

शहादा: कोरोना महामारीच्या वैश्वीक संकटा विरुध्द जीवाची पर्वा न करता परिवाराची व भविष्याची चिंता न करता असेल – नसेल त्या उपलब्ध साधनांसह फ्रंटलाईनवर योध्दा बनुन लढणाऱ्या अत्यावश्यक सेवेतील आरोग्य विभागातील आरोग्य कर्मचारी, नर्सेस, डॉक्टरांना प्रोत्साहन भत्ता म्हणून दरमहा प्रत्येकी १५ हजार रुपये त्वरित देण्यात यावेत, अशी मागणी ज्येेष्ठ सामाजिक कार्यकर्ते व आदिवासी सेवक डॉ.कांतीलाल टाटीया यांनी मुख्यमंत्री ना.उद्धव ठाकरे यांच्याकडे केली आहे.

कोरोना महामारीच्या संकटा विरुध्द जीवाची बाजी लावून समोर मृत्यू दिसत असतांना राज्यातील आरोग्य कर्मचारी, नर्सेस भगीनी व डॉक्टर योध्दा बनुन लढत असल्याने राज्याचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे व त्यांच्या मंत्रीमंडळातील सहकारी मंत्र्यांनी सर्व कर्मचाऱ्यांची कौतुक व प्रशंसा करीत आहेत. खरे तर केंद्रीय पथकातील तज्ञांनी मे २०२० अखेर राज्यात कोरोना बाधीत रुग्णांची संख्या काही लाखाच्या घरात जाऊन परिस्थिती अत्यंत भयानक निर्माण होईल, असा इशारा दिलेला असतांना रुग्णसंख्या पन्नास हजारवर नियंत्रित ठेवण्यात राज्य यशस्वी ठरले. यात आरोग्य कर्मचाऱ्यांचे योगदान खुप मोठे आहे.

राज्यातील आरोग्य कर्मचाऱ्यांची व डॉक्टरांची सेवा, त्याग, समर्पण कुठल्याही प्रकारे पैशांत तोलली जाऊ शकत नाही. असे असले तरी संबंधित कर्मचाऱ्यांचे मनोधैर्य ऊंचविले जावे. त्यांना काम करतांना प्रेरणा व हुरुप यावा, प्रोत्साहन मिळावे यासाठी कोविड -१ ९ कोरोना महामारीच्या वैश्वीक संकटाविरुध्द फ्रंटलाईनवर योध्दा बनुन लढणाऱ्या राज्यातील आरोग्य खात्यातील विविध विभागात काम करणाऱ्या सर्व आरोग्य कर्मचारी, नर्सेस भगीनी व डॉक्टरांना, स्थायी, अस्थायी व कंत्राटी कुठल्याही अस्थापनेवर काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना “ प्रोत्साहन भत्ता ” म्हणून प्रत्येकी दरमहा १५ हजार रुपये मार्च २०२० पासुन पुर्वलक्षी प्रभावाने देण्यात यावे, फरक रक्कम रोखीने व एक रक्कमी दयावी, अशी मागणी करण्यात आली आहे.

६ एप्रील २०२० रोजी राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब यांनी अत्यावश्यक सेवेमध्ये कामगिरी बजावणाऱ्या कर्मचाऱ्यांना दररोज ३०० रुपये “ प्रोत्साहन भत्ता ” देण्याची घोषणा करुन त्याची तातडीने अंमल बजावणी केली. तसेच मुंबई महानगर पालिकेतील कोविड १९ कोरोनाविरुध्द काम करणाऱ्या सार्वजनिक आरोग्य खात्यातील कर्मचाऱ्यांना प्रत्येकी दरमहा १५ हजार रुपये देण्याचा सकारात्मक निर्णय झाल्याचे समजते . त्यामुळे आरोग्य कर्मचाऱ्यांच्या पाठीवर राज्याचे मुख्यमंत्री ना. ठाकरे यांनी हात ठेवुन लढ म्हणण्यासाठी “प्रोत्साहन भत्ता ” म्हणून १५ हजार रुपये प्रत्येकांना मार्च २०२० पासुन पर्वलक्षी प्रभावाने देण्याचा निर्णय त्वरित घोषित करावा, अशी मागणी डॉ. टाटीया यांनी केली आहे.