कोरोना रुग्णांची संख्या वाढली मात्र दुपटीचा वेग मंदावला

0

मुंबई – महाराष्ट्रासह देशातील करोना रुग्णांमध्ये होणारी वाढ थांबताना दिसत नाही. देशभरात करोनाची लागण झालेल्या रुग्णांच्या संख्येत वाढ होऊन ही संख्या १८ हजार ६०१ वर पोहचली आहे. ५९० जणांचा मृत्यू झाला आहे. तर ३२५२ लोकांना उपचारानंतर घरी पाठण्यात आले आहे. दिलासादायक बाब म्हणजे, लॉकडाऊननंतर करोना संसर्गाला आळा बसला असून रुग्णांची संख्या दुप्पट होण्याचा वेग मंदावला आहे. देशव्यापी लॉकडाऊनची घोषणा होण्यापूर्वीच्या काळात देशात दर ३.४ दिवसांनी करोनारुग्णांची संख्या दुप्पट होत होती. पण लॉकडाऊननंतरच्या काळात, गेल्या सात दिवसांत करोना रुग्णांची संख्या दर ७.५ दिवसांनी दुप्पट होत आहे, असे केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचे संयुक्त सचिव आणि प्रवक्ते लव अग्रवाल यांनी सांगितले.

कोरोनाने जगभरात थैमान घातले आहे, कोरोनाचा वाढता संसर्ग रोखण्यासाठी भारतासह अनेक देशांनी लॉकडाऊनची घोषणा केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील लॉकडाऊन ३ मेपर्यंत वाढविण्याचा निर्णय घेतला आहे. देशात कोरोनाची रुग्ण संख्या दुप्पट होण्यासाठी लागणारे दिवस वाढले आहेत. १९ एप्रिलच्या आकडेवारीनुसार देशात सरासरी ७.५ दिवसांमध्ये ही संख्या दुप्पट होत आहे.