अमळनेर प्रतिनिधी-: येथील एक विवाहितेचा कोरोना मुळे मृत्यू झाला आहे तर तिचे पतीही कोरोना बाधित झाले आहेत. त्यांच्यावर जळगाव येथे उपचार सुरू आहे. या दोन कोरोना बाधित रुग्णांमुळे या आजाराविषयी शहरासह तालुक्यात दहशत पसरली आहे. पोलीस व प्रशासनाने याची दखल घेऊन कार्यवाही गतीमान केली आहे. शहरातील बहुतांश एरिया सील करण्यात आला असुन अमळनेरात हाय अलर्ट करण्यात आला आहे.
अमळनेर तालुक्यात कोरोनाचा शिरकाव झाल्याने प्रशासनाने गंभीर दखल घेतली आहे. आज साडे अकराच्या सुमारास जिल्हाधिकारी डॉ.अविनाश ढाकणे व जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ.पंजाबराव उगले यांनी येथे कोणालाही पूर्वसूचना न देता भेट . प्रांताधिकारी कार्यालयात डॉ.ढाकणे व डॉ. उगले यांनी प्रांताधिकारी सीमा अहिरे, पोलीस उपअधीक्षक राजेंद्र ससाणे, तहसीलदार मिलिंद वाघ, पोलीस निरीक्षक अंबादास मोरे, मुख्याधिकारी डॉ.विद्या गायकवाड यांच्यासोबत चर्चा करून एकूणच स्थितीचा आढावा घेतला. कोणते भाग किती व कसे सील करावेत? तेथील नागरिकांशी कसा संवाद असावा, कोणते निर्बंध असावेत, रुग्ण आढळलेल्या परिसरात आरोग्य तपासणीचे शेड्युल कसे असावे? यासह अनेक महत्वपूर्ण सूचना दिल्या.
प्रांत कार्यालयात अधिकार्यांची बैठक
प्रांताधिकारी कार्यालयात उपस्थित अधिकार्यांसह आरोग्य विभागाच्या सर्व जबाबदार अधिकारी व डॉक्टरांनाही बोलावण्यात आले. या सर्वांची सुमारे तासभर बैठक झाली. त्यात दगडी दरवाजा ते रुबजी नगर भागातील साळी वाडा, कसाली मोहल्ला, वाडी चौक,राजहोळी चौक,भोईवाडा,बालाजी पुरा,झामी चौक,माळी वाडा, रुबजी नगर, अमलेश्वर नगर, शाहआलम नगर, सप्तश्रृंगी कॉलोनी, पटवारी कॉलोनी, बस स्थानक, पाच पावली चौक, कंजर वाडा, जिनगर गल्ली,पानखिडकी आदी भाग पुर्णतः सील करण्याचे ठरले. त्याअनुषंगाने कार्यवाही सुरूही झाली आहे.
अमळनेरकरांनो गांभीर्याने घ्या
आपल्या भागात दोन कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण सापडले आहेत. या पार्श्वभूमीवर आपण किती गंभीर व काळजीपूर्वक राहायला हवे याबाबत दुर्दैवाने अजूनही पाहिजे तितके गांभीर्य लोकांमध्ये आढळत नाही. खास करून तरूणाईची बेफिकिरी चिंताजनक आहे. त्यांना वठणीवर आणण्यासाठी नाईलाजास्तव पोलिसांना सर्व प्रकारच्या प्रसादाचे मुक्त हस्ताने वाटप करावे लागत आहे. याबाबतही बैठकीत चिंता व्यक्त करण्यात आली. सील केलेल्या भागात पालिकेतर्फे दर दिवसाआड फवारणी केली जाणार आहे. आरोग्य विभाग सर्वांचीच तपासणी करणार आहे. संशयास्पद नागरिकांना तत्काळ स्थानिक पातळीवर उपचार सुरू होतील. आवश्यकता वाटल्यास त्यास तात्काळ जळगाव येथे पाठविण्यात येईल. आगामी काळ हा अमळनेरकरांसाठी गंभीर्याचा आहे. सर्वांनी घरात राहावे. संयम ठेवावा.संशयास्पद नागरिकांबाबत प्रशासनाला तात्काळ कळवावे असे आवाहन प्रशासनाने केले आहे.