कोरोना विरुध्द लढताय योध्दे; नवापूरला कोरोनाला ‘नो एन्ट्री’ मिळाल्याचा प्रत्यय

0

नवापूर :शहरासह तालुक्यात कोरोना विरुध्द आरोग्य, पोलीस, महसूल विभागातील कर्मचारी हे शुरवीर लढत आहे. त्यामुळे नवापूरला कोरोनाला नो एन्ट्री मिळाल्याचा प्रत्यय आला आहे. तहसीलदार उल्हास देवरे, नवापूर पं.स.चे गटविकास अधिकारी नंदकुमार वाळेकर, पोलीस निरीक्षक विजयसिंग राजपूत, मुख्याधिकारी राजेंद्र नजन, तालुका वैद्यकीय अधिकारी हरिषचंद्र कोकणी हे नवापूर तालुक्याला अधिकारी लाभले आहे. त्यामुळेच नवापूर अद्याप तरी कोरोनापासुन दूरच राहिले आहे. हे अधिकारी परिवारापासून दूर राहून रोज जीव धोक्यात टाकुन काम करीत असल्याचे सिध्द झाले आहे.

आदिवासी तालुका सेफ झोनमध्ये
कोरोनाची दाहकता संपूर्ण देशाला लागली आहे. त्यामुळे हजारो लोक संक्रमित होऊन शेकडो लोक मृत्यूमुखी पडले आहे. अनेक जिल्हे रेड झोन, ऑरेंज झोन, ग्रीन झोन अशाप्रकारे ग्रासले जाऊन कोरोना महामारी देशभरात आव्हान देत आहे. असे असताना नंदुरबार जिल्ह्यातील नवापूर हा आदिवासी तालुका सेफ झोनमध्ये आहे. नवापूर शहरातील प्रशासन आणि नागरिक यांच्या समन्वयामुळे नवापूर शहरात व तालुक्यात आजतागायत एकही कोरोना विषाणू संक्रमित आढळून आलेला नाही. शहरातील नागरिक कोरोनाच्या महामारीला टाळण्यासाठी स्वताःची काळजी घेत आहे. शासनाच्या नियमांचे पालन करीत आहे. कोरोना विरुध्दच्या लढाईसाठी नवापूर शहरात पोलीस विभागाचे पोलीस अधिकारी, सहायक अधिकारी, पोलीस कर्मचारी, शिपाई, गृह समादेशक कर्मचारी, महिला तर पीएसआय, कर्मचारी असे योध्दे कार्यरत आहेत.
उपजिल्हा रुग्णालयात डॉक्टर, कर्मचारी आरोग्य सेवा देत असून ज्यामध्ये पुरुष व स्त्रियांचा समावेश आहे. वैद्यकीय अधिकारी, परिचारिका, आरोग्य अधिकारी, अटेंडन्स स्वीपर, चालक, ऑफिस कौन्सिलिंग आणि लॅब असिस्टंट अशा असंख्य कर्मचार्‍यांचा समावेश आहे. महसूल विभागाच्यावतीने तहसीलदारांसह कर्मचारी समूह अहोरात्र कोरोना विरोधात लढा देत आहे. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी, राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या सूचना आणि नागरिकांचा समन्वय साधून आपल्या कर्तव्य प्रति 24 तास जीवाची परवा न करता झटत असलेल्या या वीरांना शहरवासियांचे वेळोवेळी सहकार्य मिळत आहे. त्यांच्या कार्याबद्दल शहरवासियांतर्फे कौतुक केले जात आहे.

वीर योध्देच शिलेदार ठरताय
नंदुरबार जिल्ह्यातील इतर तालुक्यांमध्ये कोरोनाचा शिरकाव झाला आहे. काही प्रमाणात लोक संक्रमित झाले आहेत. परंतु नवापूर शहर व तालुक्यात अद्याप कोणताही रुग्ण कोरोना संक्रमित नसल्याचे आढळून आले आहे. मात्र, या सर्व लॉकडाऊनच्या काळात गरजूंना मदतीचा हात देत संवेदनशील अधिकारीही पहायला मिळाले. नवापूरकरांची मनापासून काळजी घेत हात जोडुन घरात बसा सांगुन वेळेवर कायद्याचा धाक दाखवित आहे. जिवाची परवा न करता शहरवासियांना शिस्त लावून शहराला कोरोनापासून वंचित ठेवणारे शिलेदार हे खरे वीर योध्देच ठरले आहेत.