कोर्‍या सातबार्‍यासाठी संघर्ष

0

एरंडोल/पारोळा। शेतकर्‍यांचा सातबारा कोरा झाल्याशिवाय शासनाशी सुरु असलेला संघर्ष थांबणार नाही असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते तथा माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिला. सरकारला गोहत्या चालत नाही, मात्र शेतकर्‍यांची आत्महत्या चालते का?, असा सवालही त्यांनी केला काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस व समविचारी पक्षांच्या संघर्ष यात्रेतील जाहीरसभेत ते बोलत होते. आमदार डॉ. सतीश पाटील यांच्या संपर्क कार्यालयाजवळ तालुक्यातील शेतकर्‍यांचा हा मेळावा आयोजित करण्यात आला होता. यावेळी विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांच्यासह काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार तसेच काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष संदीप पाटील, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आमदार डॉ. सतीश पाटील यांचेसह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. काँग्रेसचे तालुकाध्यक्ष विजय महाजन, राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष डॉ.राजेंद्र देसले यांनी मागण्यांचे निवेदन उपस्थित नेत्यांना दिले. विरोधकांच्या या संघर्ष यात्रेने उत्तर महाराष्ट्र ढवळून निघालेला आहे. कर्जमाफीच्या मागणीची तीव्रता व सरकारविरोधात संताप वाढतो आहे.

पिडीत कुटूंबियांना मदत
यावेळी माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केंद्र व राज्य सरकारवर आक्रमक टीका केली. संघर्षयात्रा स्वतःच्या स्वार्थासाठी नाही तर शेतकर्‍यांच्या कर्ज माफीसाठी काढण्यात आली असल्याचे त्यांनी सांगितले. युतीचे सरकार शेतकर्‍यांची दिशाभूल करणारे आहे. राज्यात दररोज शेतकरी आत्महत्या करीत असूनदेखील शासन दुर्लक्ष करीत आहे. शेतकर्‍यांची मुले व मुलीदेखील कर्जाला कंटाळून जीवनयात्रा संपवत असून आणखी किती बळींची वाट सरकार पाहणार आहे असा प्रश्न त्यांनी केला. काँग्रेसचे प्रवक्ते आमदार भाई जगताप यांनी कृषीमालाला आधारभूत किंमत देण्याची मागणी केली. युतीचे सरकार पोकळ घोषणा करणारे सरकार असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी तालुक्यातील आत्महत्या केलेल्या शेतकर्‍यांच्या पत्नी व मुलींना साडीचोळी वाटप करण्यात आले पराग पाटील यांनी प्रत्येक कुटुंबाला 2100 रूपयांची मदतही दिली आहे. नेत्यांनी आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटूंबियांची माहिती जाणून घेतली.

पाळधीत जाणून घेतल्या समस्या
या संघर्षयात्रेत पाळधी येथे 100 बैलगाड्यांचाही सहभाग होता. विरोधी पक्ष नेत्यांनी शेतकर्‍यांशी संवाद साधला, बैलगाडीत बसून माजी उपमुख्यमंत्री अजित पवार, माजी अर्थमंत्री जयंत पाटील, विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते धनजंय मुंडे, आमदार शशिकांत शिंदे, गुलाबराव देवकर यांनी शेतकर्‍यांशी संवाद साधला, त्यांचे निवेदन स्वीकारले. राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष भटेश्‍वर पाटील, प्रा. एन.डी. पाटील, माजी जि.प. सदस्य रवींद्र पाटील, रमेश पाटील आदी कार्यकर्त्यानी या नेत्यांचे स्वागत केले. पुढे ही यात्रा एरंडोलकडे रवाना झाली. विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील, माजी उपमुख्यमंत्री अजित पवार, विधानपरिषदेतील विरोधी पक्षनेते धनजंय मुंडे, आमदार शशिकांत शिंदे, दिलीप वळसे-पाटील, समाजवादी पक्षाचे अबू आझमी, ‘रिपाइं’चे जोगेंद्र कवाडे आदी नेते या यात्रेत सहभागी आहेत. पारोळ्यानंतर संघर्षयात्रा नंदुरबारच्या शहाद्यात पोहचणार आहे. शहाद्यात सभा संपल्यावर संघर्षयात्रा धुळ्यात मुक्कामी जाईल.