धुळे । शहरातील शासकीय दूध डेअरी जवळील कोळवले नगर येथे महामहामार्गावरील दुकान न्यायालयाच्या निर्णयानुसार बंद झाले आहे. ते दुकान कोळवले नगरातील रहिवाशी क्षेत्रात स्थलांतरीत करण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. या दुकानाच्या विरोधात परिसरातील कोळवते नगर , समता नगर, सहजिवन नगर, दूध डेअरी नगर परिसरातील नागरिक एकवटले आहेत. या सर्व नागरिकांनी एकत्र येवून शिवसेनेचे महानगर प्रमुख सतिश महाले यांच्या नेतृत्वात जिल्हाधिकारी तुकाराम हुळवले व राज्य उत्पादन शुल्क अधिकारी डॉ. मनोहर अंचाले यांना निवेदन देवून या प्रस्तावित दुकानास परवानगी न देण्याची मागणी करण्यात आली आहे.
सामाजिक अशांतता निर्माण होण्याची भिती
धुळे महापालिका हद्दीतील 494, 493, 492, 487 मध्ये गेल्या अनेक वर्षांपासून कुटूंबासोबत राहत असून नोकरी, उद्योग, मजुरी करून चलितार्थ चालवित आहोत. न्यायालयाच्या आदेशाने राष्ट्रीय महामार्ग, राज्य महामार्गालगतचे दारू विक्रीचे दुकान, परमिट रूम, वाईन शॉप व बिअरबार 1 एप्रिलपासून बंद करण्यात आलेले आहेत. या आदेशामुळे राज्य महामार्गालगतच्या दारू विक्रीचे दुकान व परमिट रूम रहिवाशी क्षेत्रात स्थलांतरीत होण्याची प्रक्रीया सुरू झालेली आहे. कोळवले उद्याना समोरील गताणी यांनी त्या जागेत दारू विक्रीचे दुकान स्थलांतरीत करण्याकरिता कार्यवाही सुरू केली आहे. उद्यान परिसरातील नागरिक, लहान मुले, महिला येत जात असतात. त्याच प्रमाणे गुरूद्वारामागे असलेल्या सेंट अॅन्स स्कुल, निम्स शैक्षणिक संस्था या विद्यालयांना वापरासाठी हा एकमेव मार्ग आहे. येथेच साईबाबा मंदिर, महादेव मंदिर, नवनाथ मंदिर आहे.
या दारू विक्री दुकानास या जागेत स्थलांतराची परवानगी मिळाल्यास दारू पिणारे लोक तेथेच दारू विकत घेवून अशांतता निर्माण करतील. यामुळे सामाजिक अशांतता निर्माण होवु शकते. यामुळे कोळवले नगरमध्ये दारू विक्री दुकानाचे स्थलांतर किंवा नवीन दारू विक्री दुकानास परवानगी देण्यात येवू नये अन्यथा संघर्ष समितीची स्थापना करून आंदोलन छेडण्याचा इशारा निवेदनाद्वारे देण्यात आला आहे. या निवेदनावर नगरसेवक सतिश महाले, नगरसेविका सारिका अग्रवाल, मनोज वाघ, शिवप्रसाद डेरे, प्रविण अग्रवाल यांच्यासह इतरांच्या सह्या आहेत.