कोळसा टंचाईचा फटका : दीपनगरातील संच पाच बंद

0

भुसावळ- कोळशाच्या साठ्याअभावी 500 मेगावॅट स्थापित क्षमतेचा संच क्रमांक पाच प्रशासनाला बंद करण्याची नामुष्की ओढवली. सध्या केवळ संच क्रमांक चार हा 500 मेगावॅट क्षमतेचा एकमेव संच कार्यरत आहे. राज्याची वीज मागणी 20 हजार मेगावॅटपेक्षा अधिक असताना कोळसा टंचाईमुळे संच बंद (शटडाऊन) करण्यात आल्याने आपत्कालीन भारनियमन वाढण्याची भीती आहे. बुधवारी दीपनगर केंद्रात 18 हजार मेट्रीक टन अर्थात केवळ एक दिवस पुरेल इतकाच कोळसासाठा शिल्लक होता. दोन दिवसांत या साठ्यातही घट झाली. यामुळे कोळशाचा साठा सात ते दहा हजार मेट्रीक टनांवर पोचला. यामुळे रविवारी पहाटे तीन वाजेच्या दरम्यान दीपनगर प्रशासनाने संच क्रमांक पाच वीज निर्मितीसाठी बंद करण्याचा निर्णय घेतला. दीपनगर औष्णिक वीजनिर्मिती केंद्रात 500 मेगावॅट स्थापित क्षमतेचे दोन संच कार्यरत असून 210 मेगावॅट क्षमतेचा संच क्रमांक तीन सध्या एमओडीमुळे बंद आहे. 1210 मेगावॅट स्थापित क्षमतेच्या तुलनेत किमान 988 मेगावॅट वीजनिर्मिती होणे अपेक्षीत आहे. मात्र कोळशाच्या टंचाइमुळे संच क्रमांक पाच बंद करण्यात आल्याने सध्या केवळ संच क्रमांक चारमधून वीज निर्मिती होत आहे.