जळगाव: कोळी समाजाला जातवैधता प्रमाणपत्र देण्यास टाळाटाळ केली जाते. यामुळे शालेय विद्यार्थी, शासकीय कर्मचारी तसेच राजकीय लोकप्रतिनिधींना अडचणींचा सामना करावा लागत आहे. प्रशासनाच्या आडमुठेपणाच्या धोरणामुळे आतापर्यंत तीन समाजबांधवांनी आत्महत्या करावी लागली. त्यामुळे या विरोधात कोळी समाजातर्फे दि.२६ रोजी सकाळी १० वाजता जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात येणार असल्याची माहिती ऍड. गणेश सोनवणे यांनी पत्रकार परिषदेत दिली.
टोकरे कोळी, महादेव कोळी, मल्हार कोळी जमातीचा अनुसूचित जातीत समावेश आहे. मात्र उपविभागीय अधिकार्यांकडून जातवैधता प्रमाणपत्र बदलून दिले जात नाही. त्यामुळे समाजबांधव आपल्या संविधानिक हक्कापासून वंचित राहत आहे. अधिकार्यांच्या मनमानीमुळे चोपडा तालुक्यातील सुरेश कोळी, बुलढाणा जिल्ह्यातील महादू वाघ तसेच नोकरीवरुन बडतर्फ केल्याबद्दल वाल्मीक सपकाळे यांनी आत्महत्या केली. यास प्रशासन जबाबदार असल्याचा आरोपही ऍड. सोनवणे यांनी पत्रकार परिषदेत केला. तसेच मयतांच्या वारसांना २० लाख रुपये अनुदान मिळावे, वाल्मीक सपकाळे यांच्या वारसाला तात्काळ सेवेत घ्यावे. १९५० च्या पुर्वीच्या जातीचा उल्लेख असलेल्या पुराव्यांचा आग्रह धरु नये. प्रमाणपत्र पडताळणी कार्यालय जळगाव येथे हलविण्यात यावे. जोपर्यंत समिती निर्णय देत नाही तोपर्यंत नोकरदार, लोकप्रतिनिधी यांचे सदस्यत्व रद्द करु नये. आदी प्रमुख मागण्यांच्या पुर्ततेसाठी वाल्मिक नगर येथून सकाळी १० वाजता जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात येणार असल्याचे बाळासाहेब सैंदाणे यांनी सांगितले. पत्रकार परिषदेत नामदेव येडपे, गोविंदा तायडे, संदिप शिरसाठ, बाळू कोळी उपस्थित होते.