कोवळ्या मुलांच्या आत्महत्या हा सामाजिक कलंक

0

पुणे । कोवळ्या मुलांच्या आत्महत्या हा सामाजिक कलंक आहे. मुलांना केवळ भौतिक सुविधा देऊन पालकांची जबाबदारी संपत नाही. मुलांसाठी वेळ द्या, त्यांच्याशी संवाद साधा आणि अपयशातही त्यांची पाठराखण करा, असे आवाहन शोध अस्वस्थतेचा : मुलांच्या आत्महत्येचा या परिसंवादातून करण्यात आले आहे.महाराष्ट्र साहित्य परिषद, शब्दांगण आणि रोहन प्रकाशन यांच्या वतीने आयोजित या परिसंवादात लेखक राजीव तांबे, मानसोपचार तज्ज्ञ डॉ. संज्योत देशपांडे, संगणकतज्ज्ञ अतुल कहाते, डॉ. वर्षा तोडमल सहभागी झाले होते. मसापचे कार्याध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी यांची कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थान भूषविले. मसापच्या कोषाध्यक्ष सुनीताराजे पवार, शब्दांगणचे लक्ष्मण राठीवडेकर, रोहन प्रकाशनचे रोहन चंपानेरकर, मनोविकास प्रकाशनचे अरविंद पाठकर याप्रसंगी उपस्थित होते.

मुलांची तुलना करणे थांबवा
पालकांनी मुलांच्या अपयशातही त्यांची साथ दिली पाहिजे. त्यांच्यावर विश्वास ठेवला पाहिजे, मुलांची तुलना करणे थांबविले पाहिजे, असा सल्ला तांबे यांनी यावेळी दिला. मुलांना गरज असते तेव्हा पालकांना वेळ नसतो, वेळ असतो तेव्हा इच्छा नसते त्यामुळे मुलांची संवादाची भूक तंत्रज्ज्ञानाच्या माध्यमातून भागविली जाते, हे चिंताजनक आहे. तंत्रज्ञान किती वापरायचे याचा विवेक मुलांना शिकविला पाहिजे, असे कहाते यांनी सांगितले.

गरज भावनिक संवादाची
स्पर्धा तसेच पालकांकडून प्रेम आणि अपेक्षांचा कडेलोट झाल्यामुळे मुलांच्या मनावर ताण येतो. मुलांना केवळ भौतिक सुविधा देऊन पालकांची जबाबदारी संपत नाही, गरज आहे ती भावनिक संवाद साधण्याची, त्यांचे एकटेपण दूर करण्याची. मोबाइलपेक्षा मुले पुस्तकाशी मैत्री करतील याकडे लक्ष दिले पाहिजे, असे जोशी यांनी सांगितले. मुलांना मरायचे नसते. असह्य मानसिक वेदना कमी करण्यासाठी ते आत्महत्या करतात. त्यापूर्वी मुले संदेश देत असतात, त्याकडे पालकांनी गांभीर्याने पाहिले पाहिजे, असे देशपांडे यांनी सांगितले. सुनीताराजे पवार यांनी प्रास्ताविक केले. लक्ष्मण राठीवडेकर यांनी सूत्रसंचालन तर दीपक करंदीकर यांनी आभार मानले.