कोस्टल रोडला मच्छीमारांचा विरोध

0

मुंबई । रखडलेला दक्षिण मुंबई ते पश्‍चिम उपनगरातील विकासाला राज्य सरकार गती देत असताना नियोजित कोस्टल रोडला मुंबईतील मच्छीमार संघटनेने विरोध केला आहे. याबाबत मच्छीमार संघटनेने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदन दिले असून सरकारने याबाबत निर्णय न घेतल्यास थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना आम्ही घेराव घालू, असा इशारा संघटनेने दिला आहे.

गेली अनेक वर्षे या महत्त्वपूर्ण प्रकल्पाचे काम विविध परवानगी अभावी रखडले होते. मुंबई समुद्र किनारपट्टीवर कांदिवली ते नरिमन पॉइंट येथे कोस्टल रोड बांधण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. कोस्टल रोडमुळे समुद्रात प्रचंड प्रमाणात भराव टाकण्यात येणार आहे. त्यामुळे समुद्राची पाण्याची पातळी वाढून समुद्राच्या उच्चतम भरती तसेच वादळी वार्‍यामुळे समुद्राचे पाणी पसरून मुंबई पाण्याखाली जाण्याची शक्यता आहे. तसेच या कोस्टल रोडलगत कोळीवाडे व मच्छीमार वसाहती आहेत. कोस्टल रोड बांधताना कोळीवाडे व मच्छीमार वसाहतींना धोका निर्माण होण्याची शक्यता आहे. तसेच कोस्टल रोड बांधण्यात येणार्‍या समुद्र किनारी असलेल्या तिवरांच्या झाडांची मोठ्या प्रमाणावर कत्तल होणार आहे. यामुळे माशांचे प्रजनन होणार नाही. समुद्रात मोठ्या प्रमाणावर माशांची घट होऊन मासेमारी व्यवसाय धोक्यात येईल, अशी भीती मच्छीमारांना आहे. यामुळेच मच्छीमारांनी कोस्टल रोडला विरोध केला असल्याचे मच्छीमार संघटनेचे अध्यक्ष व मच्छीमार नेते महेश तांडेल यांनी सांगितले.

हा प्रकल्प तातडीने रद्द करण्याचा निर्णय घ्यावा, नाहीतर मच्छीमार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना घेराव घालतील, असा थेट इशाराही मच्छीमार संघटनेने दिला आहे. या मार्गासाठी भराव टाकल्यानंतर मच्छीमारीवर परिणाम होणार असल्याने त्यांनी हा मार्ग रद्द करावा अशी मागणी संघटनकडून करण्यात आली आहे. राज्यातील सरकारने गेल्या दोन वर्षांत प्रकल्पाची तातडीने कार्यवाही होण्यासाठी पाठपुरावा केल्याने हा प्रकल्प उभारण्याचे स्वप्न आता साकार होणार आहे. दरम्यान या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाला मच्छीमारांनी विरोध केल्याने मुख्यमंत्री पेचात पडले आहेत.