कराची । चॅम्पियन्स ट्रॉफीच्या अंतिम सामन्यात पाकिस्तानने भारतावर मिळवलेल्या विजयाचे कवित्व अजून संपलेले नाही. या सामन्यात शतक ठोकून पाकिस्तानच्या विजयात मोलाची भूमिका बजवाणार्या फखार इमानने एका संकेत स्थळाला दिलेल्या मुलाखतीत, त्याला बाद करण्यासाठी भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली आणि जसप्रीत बुमराहने स्लेजींग केल्याचा दावा केला आहे. या सामन्यात शतकी खेळी करताना फखारने भारतीय गोलंदाजांना हैराण केले होते.
या मुलाखतीत फखार म्हणाला की, अझर अली आणि मी मैदानात असताना भारतीय क्रिकेटपटू सतत आमच्यावर दडपण आणण्याचा प्रयत्न करत होते. विराट कोहली सतत आपल्या गोलंदाजांना, अरे एक विकेट निकल जाएगा तो सारे आऊट हो जाएंगे. बस एक को निकाल जल्दी. असे म्हणत विराट सतत माझं लक्ष विचलीत करण्याचा प्रयत्न करत होता. बुमराहच्या गोलंदाजीवर मी बाद झालो. मात्र तो नो बॉल असल्यामुळे मला जीवदान मिळालं, नंतर ही बाब बुमराहला चांगलीच लागली होती. त्याच्या गोलंदाजीवर मी काही फटके लगावले, त्यावेळी बुमराहने मला थोडा सामने भी रन बना ले. कब तक ऐसा खेलेगा असं म्हणत डिवचण्याचा प्रयत्न केला.
मात्र या दरम्यान भारताच्या कोणत्याही खेळाडूने आपली मर्यादा सोडली नाही. आपला संघ जिंकावा असं प्रत्येकाला वाटत असते, त्यामुळे मैदानात शेरेबाजी हा त्याचाच एक हिस्सा असल्याचे सांगत आपण ही गोष्ट फारशी मनाला लाऊन घेतली नाही असेही फखार झमानने या मुलाखतीत स्पष्ट केले.