कौटुंबिक कलहातून पत्नी माहेरी गेल्याने भुसावळात तरुणाची ‘विरूगिरी’

0

चार तासांच्या मनधरणीनंतर तरुणाला खाली उतरण्यात यंत्रणेला यश ; पोलिस यंत्रणेची धावपळ

भुसावळ- प्रेम विवाहातून फुललेल्या संसारात आलेल्या वितुष्टानंतर पत्नी माहेरी निघून गेल्याने आलेल्या नैराश्यातून तरुणाने थेट विरूगिरी करीत रेल्वेच्या जीर्ण जलकुंभावर चढून शंभर फुटावरून उडी मारण्याची धमकी दिली. शुक्रवारी पहाटे घडलेल्या या प्रकाराची वार्ता लिंम्पस क्लब परीसरात कळताच मोठ्या संख्येने जमाव जमला. तरुणाने खाली उतरावे यासाठी पहाटेपासून तरुणाच्या कुटुंबियांनी त्याची मनधरणी केली तसेच पोलिस प्रशासनासह आपत्ती व्यवस्थापनाचे कर्मचारी आले, त्यांनी समजूत काढली मात्र तीही व्यर्थ ठरली. अखेर साडेऊन वाजेच्या सुमारास पत्नीसाठी विरूगिरी करणार्‍यास त्याच्या भावाने मोबाईल लावून समजूत काढल्यानंतर हा तरुण जलकुंभाखाली उतरल्याने सर्वांनीच सुटकेचा श्‍वास घेतला.

चास तासांच्या ‘विरूगिरी’ने कुटुंबियांना फुटला घाम
रेल्वेच्या लिम्पस क्लब भागातील रहिवासी असलेल्या मनोज शुक्ला (28) या युवकाने रेल्वे परीसरात पाणीपुरवठा करणार्‍या जलकुंभावर शंभर फुटापर्यंत चढून शुक्रवारी पहाटे साडेपाच वाजेच्या सुमारास विरूगिरी केली. पाहता-पाहता हा प्रकार कळताच अनेकांनी घटनास्थळी धाव घेतली. शुक्लाच्या कुटुंबियांना याबाबतची माहिती कळताच त्यांनीही मुलाने खाली उतरावे यासाठी आर्जव केले मात्र तरुण ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हता. तीन वर्षांपूर्वी मनोजचा प्रेम विवाह झाल्यानंतर काही दिवसांपूर्वीच कौटुंबिक कलहातून मनोज फ्रस्टेड झाल्याने त्याने जलकुंभावरून आत्महत्या करण्याची धमकी दिली. शहर पोलिस ठाण्याचे पोलिस उपनिरीक्षक के.टी.सुरळकर, प्रमोद पाटील, विजय पाटील, होमगार्ड प्लाटून अधिकारी सुरेश इंगळे, होमगार्ड भानू बारसे, सर्पमित्र सतीश कांबळे यांनी घटनास्थळी धाव घेतली. सर्वांनी शुक्लाला समजावले मात्र तो ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हता. पोलिसांनी पत्नीला पुन्हा सासरी येण्यासाठी महिला दक्षता समितीकडे जाण्याचा प्रस्ताव ठेवत मदत करण्याचे आश्‍वासनही दिले मात्र मनोज ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हता मात्र त्याच्या भावाने त्याची समजूत काढल्यानंतर सकाळी साडेनऊ वाजेच्या सुमारास तो जलकुंभाखाली उतरला. तब्बल चार तास चाललेल्या विरूगिरीनंतर उपस्थितांना अप्रिय घटना टळल्याने हायसे वाटले. दरम्यान, या विरूगिरीची शहरात दिवसभर चांगलीच चर्चा राहिली. वेळप्रसंगी रीक्षा चालवून तसेच खाजगी दवाखान्यात काम करून मनोज कुटुंबांचा चरीतार्थ चालवत असल्याची माहिती मिळाली.