कौन बनेगा राष्ट्रवादी शहराध्यक्ष?

0

नाना काटे, प्रशांत शितोळे, संदीप पवार, विलास लांडे नावे चर्चेत
अजित पवार नाव जाहीर करणार पुढील आठवड्यात

पिंपरी-चिंचवड : महापालिका निवडणुकीतील दारुण पराभवाच्या कारणांचा केलेला अभ्यास आणि आगामी लोकसभा-विधानसभा निवडणुकीची लागलेली चाहुल या पार्श्‍वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार शहराला नवा अध्यक्ष देणार असे खात्रीलायक वृत्त आहे. यासाठी नाना काटे, प्रशांत शितोळे, संदीप वार, विलास लांडे यांची नावे चर्चेत असून यापैकी एकाच्या नावाची घोषणा पुढील आठवड्यात होण्याची माहिती मिळत आहे.मधील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा शहराध्यक्ष बदलाच्या हालचालींना वेग आला असून, येत्या 30 जूनपूर्वी नवीन शहराध्याच्या निवडीची घोषणा होईल, अशी माहिती विश्‍वसनीय सूत्रांकडून मिळाली आहे. आजी-माजी नगरसेवक आणि ज्येष्ठ नेत्यांमध्ये योग्य समन्वय राखू शकेल अशाला अधिक पसंती असेल, तसेच तरुण व नव्या चेहर्‍याला अधिक पसंती मिळेल, असा अंदाज कार्यकर्त्यांचा आहे.

कदाचित हे नसतील शर्यतील
विद्यमान अध्यक्ष संजोग वाघेरे यांचा कार्यकाल नुकताच संपला आहे. त्यातच त्यांना लोकसभा निवडणुकीची तयारी करण्याबाबत पक्षश्रेष्ठींनी ‘हिरवा कंदील’ दाखविला असल्याचे सांगितले जाते. चर्चेत नाव असलेल्या ज्येष्ठ नगरसेवक नाना काटे, माजी नगरसेवक प्रशांत शितोळे, युवा नेते संदीप पवार यांची नावे चर्चेत आहेत. मात्र, काटे आणि शितोळे यांनी आपण विधानसभा निवडणुकीच्या तयारीत असल्याने अध्यक्षासाठी शर्यतीत नसल्याचे अनेकदा जाहीर केले आहे. त्यामुळे शहराध्यक्षपदाची माळ कुणाच्या गळ्यात पडणार, याकडे कार्यकर्त्यांचे लक्ष लागले आहे. लांडे यांना विधानपरिषदेवर घेतले जाईल अशी शक्यता आहे. अन्यथा ते पुन्हा एकदा भोसरी विधानसभेतून लढण्यास तयारच आहे. विधानपरिषदेची पक्के आश्‍वासन मिळाले, तर त्यांना अध्यक्षपदात रस नसेल. त्यामुळे संदीप पवार यांचेच नाव उरते.

संदीप पवारांना लागू शकते लॉटरी
संदीप पवार मुळचे मुळशी तालुक्यातील आहेत. त्यांच्या आजोबांपासून पवार घराण्याशी एकनिष्ठता आहे. पंचायत समिती इमारत उभारणी आजोबांनी शरद पवारांच्या सहकार्यातून 80 लाख खर्चून केली आहे. नंतर ते पिंपरी-चिंचवडमध्ये आल्यावर त्यांच्या आई मागील पंचवार्षिकमध्ये राष्ट्रवादीच्या नगरसेविका होत्या. या माध्यमातून ताथवडे-पुनावळे परिसरात त्यांची ताकद आहे. या निवडणुकीत राष्ट्रवादीचे संपूर्ण पॅनेल प्रभागात पराभूत झाल्याने त्यांच्याकडे कोणतेच पद नाही. मात्र, संदीप यांचा असलेला जबरदस्त जनसंपर्क, तसेच नवा व तरुण चेहरा म्हणून त्यांना अध्यक्षपदाची लॉटरी लागू शकते, असेही समजते.

…असा हवा आहे अध्यक्ष
शहराध्यक्ष बदलाचे संकेत काळेवाडी येथील हल्लाबोल सभेत खासदार सुप्रिया सुळे यांनी स्पष्टपणे दिले होते. त्या म्हणाल्या होत्या, ‘ज्यांना पक्षाने अनेक पदे देवून मोठे केले, तरीही त्यांनी पक्षाशी गद्दारी केली. काहींनी पक्षात राहून पक्षविरोधी काम केले, अशा घरभेद्यांना अजितदादा कदापीही माफ करणार नाहीत.’ त्यामुळे शहराध्यक्षपदाच्या निवडीत आता पक्ष संघटना आणि पक्षाच्या नेत्यांसोबत प्रामाणिक राहणारा चेहर्‍याला संधी मिळावी, अशी अपेक्षा कार्यकर्त्यांकडून व्यक्त होत आहे.