‘कौमार्य चाचणी’ प्रथेविरोधात जागृती करणार्‍या तरुणांना बेदम मारहाण

0

पाच मुख्य आरोपींसह 40 जणांविरोधात पिंपरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल

पिंपरी-चिंचवड : कंजारभाट समाजात घेतल्या जाणार्‍या ‘नववधू कौमार्य चाचणी’ प्रथेविरुद्ध ‘व्हॉट्स अ‍ॅप’व्दारे जनजागृती करणार्‍या दोन तरुणांना समाजातीलच काही तरुणांकडून बेदम मारहाण करण्यात आली. याप्रकरणी सनी मलके (वय 25), विनायक मलके (22), अमोल भाट (20), रोहित रावळकर (21), नेहूल तामचिकर (23, सर्व रा. भाटनगर) यांच्यासह 40 साथीदारांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. प्रशांत टिंबरेकर या तरुणाने त्यांच्याविरोधात पिंपरी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

जनजागृती विरोधात काहींचा विरोध
कंजारभाट समाजात लग्नानंतर नववधूची कौमार्य चाचणी घेण्याची अनिष्ट प्रथा आजही कायम आहे. या विरोधात समाजातील काही तरुणांनी व्हॉट्स अ‍ॅपच्या माध्यमातून सतत जनजागृतीची मोहिम उघडली आहे. त्यासाठी विवेक तमाईचिकर याने डीेिं ढहश तठर्ळीींरश्र या नावाने ग्रुप तयार केला आहे. फिर्यादी प्रशांत टिंबरेकर याच्यासह मित्र सौरभ मछले आणि प्रशांत तामचिकर ग्रुपचे सदस्य आहेत. या माध्यमातून समाजातील ही प्रथा बंद व्हावी यासाठी ते प्रयत्न करीत आहेत. विशेष म्हणजे त्यांच्या या मोहिमेला अंधश्रद्धा निर्मुलन समितीनेही पाठिंबा दिला आहे. मात्र त्यांची ही जनजागृती त्यांच्याच समाजातील अन्य तरुणांना पटत नव्हती.

लग्न मंडपातच मारहाण
दरम्यान, आरोपी सनी मलके याच्या बहिणीचा विवाह होता. फिर्यादी प्रशांत व त्याचे मित्र सौरभ आणि प्रशांत तामचिकर यांना लग्नाचे निमंत्रण देऊन सनी याने बोलावले होते. रविवारी (दि. 21) रात्री हा विवाह सोहळा पार पडला. यावेळी प्रथेनुसार नंतर जातपंचायत भरली. जात पंचायत संपल्यानंतर प्रशांत हा आपल्या आई व बहिणीला घेण्यासाठी लग्न मंडपात गेला असता तिथे आरोपी सनी व त्याचे साथीदार हे सौरभ मछले याला मारहाण करीत होते. तुम्ही कौमार्य प्रथेविरुद्ध आवाज उठवून जात विरोधी कृत्य करीत आहात असे म्हणत त्याला मारहाण सुरू होती. यावेळी प्रशांत टिंबरेकर व प्रशांत तामचिकर त्याला सोडवायला गेले असता त्यांनाही सनीसह अन्य सर्व आरोपींनी बेदम मारहाण केली. यामध्ये सौरभ मछले याची सोन्याची चैन आणि घड्याळ हरवले.

विविध गुन्हे दाखल
याविरोधात प्रशांत टिंबरेकर याने पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार आरोपी सनी मलके विनायक मलके, अमोल भाट, रोहित रावळकर, मेहूल तामचिकर त्यांचे अन्य 40 साथीदार यांच्या विरोधात कलम 143,147, 149, 323, 506, 427 अंतर्गत पिंपरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पिंपरी पोलीस पुढील तपास करीत आहे.

समाजाच्या ज्या काही रुढी परंपरा आहेत, त्यानुसार विवाहसोहळा झाला. मात्र, कौमार्यचाचणी वगैरे काही सुरू नव्हती. भांडण होण्याचे कारण म्हणजे प्रथेनुसार जे विधी सुरू आहेत, त्याचे मोबाईलमध्ये चित्रीकरण काहीजण करत होते. त्याला आमचा विरोध होता. तसेच सोशल मिडियाव्दारे अनेक अफवा पसरवून समाजाची बदनामी केली जात आहे. आता समाज शिक्षित होत आहे. मात्र, सर्वच प्रथा, रुढी, रीतीरिवाज बदला या म्हणण्याला जुन्या पिढीतील लोकांचा विरोध आहे. बदल हळूहळू होतील. एकाच रात्रीत बदलाची अपेक्षा चुकीचे आहे, असे म्हणणे समाजातील काहींचे आहे.