कौशल्य योजनेत रोजगार द्या

0

जळगाव । कौेशल्य विकास कार्यक्रमातंर्गत तरुणांना प्रशिक्षण देण्याबरोबरच त्यांना रोजगार व स्वयंरोजगारास प्रोत्साहन दिले जावे तसेच त्यांच्या उत्पादनांना वितरणाची व्यवस्था उपलब्ध करुन देण्यासाठी प्रयत्न करावेत, अशी सूचना जिल्हाधिकारी किशोर राजे निंबाळकर यांनी केली. जिल्हा कौशल्य विकास कार्यकारी समितीची बैठक जिल्हाधिकारी श्री. निंबाळकर यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयास संपन्न झाली. बैठकीस राज्य महिला आयोगाच्या सदस्य देवयानी ठाकरे, कौशल्य विकास विभागाच्या सहायक संचालक श्रीमती अनिसा तडवी, जिल्हा नियोजन अधिकारी वाघ यांचेसह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते. जिल्हाधिकारी पुढे म्हणाले की, कौशल्य विकास कार्यक्रमातंर्गत तरुण, तरुणी एकाच विषयाचे प्रशिक्षण घेत असतात. त्यामुळे समाजात एकाच विषयाचे अनेकजण प्रशिक्षित होतात. परंतु त्यांना त्याप्रमाणात रोजगार उपलब्ध होत नाही. तर काही रोजगार मिळवून देणारे विषय असे असतात की, त्या विषयांचे तरुणांना प्रशिक्षणच नसल्यामुळे त्यांना त्या विषयात रोजगार किवा स्वयंरोजगार उपलब्ध होत नाही. ही बाब लक्षात घेऊन कौशल्य विकास विभागाने तरुण, तरुणींना वेगवेगळया विषयांचे प्रशिक्षण घेण्यासाठी प्रोत्साहन द्यावे असे आवाहन त्यांनी केले.

तरुणांच्या रोजगार निर्मितीबाबत सक्षम प्रक्रिया राबविणे गरजेच
नुसतेच तरुणांना व महिलांना जुजबी प्रशिक्षण देऊन न थांबता त्यांना त्या क्षेत्रात रोजगार व स्वयंरोजगार मिळण्यासाठी सखोल व पुरेपुर मार्गदर्शन करावे. त्यांना स्वतःचे पायावर उभे राहण्याचे दृष्टीने स्वयंरोजगार सुरु करण्यासाठी मुद्रा योजनेच्या माध्यमातून कर्ज उपलब्ध होण्यासाठी मार्गदर्शन करावे. त्याचबरोबर त्यांना व्यवसायाभिमुखता निर्माण करण्याच्या दृष्टीने नियोजीत प्रशिक्षण घेतलेल्या विषयांबाबत सविस्तर माहिती देऊन त्यांच्या उत्पादनांना बाजारपेठेत मागणी कशी उपलब्ध होईल, त्यांनी उत्पादित केलेला माल जास्तीत जास्त कुठे व कसा विकला जाईल याचेही मार्केटींग विषयक मार्गदर्शन होणे आवश्यक असल्याचे जिल्हाधिकारी किशोर रोजे निंबाळकर यांनी यावेळी केले.

बचतगट करा मजबूत
जिल्हयातील वैशिष्टपूर्ण बाबींची जसे. भरताची वांगी, केळीचे वेफर्स आदि बाबींचे मार्केटींग करुन त्यांची विक्री वाढण्यासाठी मदत होणे आवश्यक आहे. यासाठी बचतगट व इतरांना वेगवेगळे प्रशिक्षण देण्यासाठी कौशल्य विकास विभागाने पुढाकार घ्यावा. जेणेकरुन जिल्हयातील बेरोजगार तरुणांना या योजनेअंतर्गत विविध स्वरुपाचा रोजगार उपलब्ध होवून त्यांचा आर्थिक स्तर उंचावण्यास मदत होईल. असेही जिल्हाधिकारी यांनी यावेळी
सांगितले.