रक्कम लुटीप्रकरणी दोघा निलंबित पोलिसांच्या घरावर छापे

0

सांगली – वारणानगर येथील चोरीतील संशयित निलंबित पोलीस दीपक पाटील आणि रवींद्र पाटील यांच्या निवासस्थानावर सांगली व कोल्हापूरच्या सीआयडी पथकाने संयुक्तपणे छापा टाकून काही कागदपत्रे जप्त केली.

वारणानगर येथे १२ मार्च २०१६ रोजी झालेल्या कोट्यवधीच्या चोरीचा छडा सांगलीच्या स्था. गु. अ. शाखेने लावला होता.

चोरीचा मुख्य संशयित मैनुद्दीन मुल्ला याच्याकडून पोलिसांनी त्याच्या बेथेलहेमनगर येथील घरातून बॅगेत ठेवलेले तब्बल ३ कोटी ७ लाख रुपये जप्त केले होते. या कारवाईनंतर पोलिसांनी त्या फ्लॅटमधून अजून दीड कोटीची रक्कम जप्त केली होती. इतकी मोठी रक्कम सापडल्याने सर्वत्र मोठी खळबळ उडाली होती.

कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक विश्वास नांगरे-पाटील यांना या प्रकरणाचा तपास करण्याचे आदेश कोल्हापूरचे अपर पोलीस अधीक्षक सुहेल शर्मा यांना दिले होते. चौकशीमध्ये विश्वनाथ घनवट, सूरज चंदनशिवे, शरद कुरळपकर, शंकर पाटील, रवींद्र पाटील, दीपक पाटील, कुलदीप कांबळे या पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांचा सहभाग असल्याचे उघड झाले होते. या प्रकाराने सांगली पोलीस दलात खळबळ माजली होती.

झुंजार सरनोबत यांनी रकमेच्या चोरीबाबत कोडोली पोलीस ठाण्यात तक्रार केली होती. गुन्हा दाखल झाल्यानंतर सर्वजण गायब झाले होते. काहींनी पोलिसांसमोर शरणागती पत्करली आहे.