सावित्रीबाई जोतीराव फुले यांचा जन्म सातारा जिल्ह्यातील खंडाळा तालुक्यातील नायगाव या गावी झाला. त्या शिक्षणप्रसारक, समाजसुधारक महिला होत्या. महाराष्ट्रातील स्त्रीशिक्षणाच्या सुरुवातीच्या काळात त्यांचे पती क्रांतीबा जोतीराव फुले यांच्यासह त्यांनी मोठी कामगिरी बजावली. सावित्रीबाई या मराठीतील पहिल्या कवयित्री आहेत. आपल्या नायगाव या गावाविषयावरील त्यांची कविता अप्रतिम आहे. सावित्रीबाई फुले यांनी शिक्षणाचा प्रसार केला. सावित्रीबाई फुले या भारतातील पहिल्या मुख्याध्यापिका होत्या. आज 10 मार्च क्रांतीजोती सावित्रीमाई फुले यांचा 121 वा स्मृती दिन.
परवाच राज्यात आंतरराष्ट्रीय महिला दिन साजरा झाला. देशभरात अनेक कार्यक्रम साजरे झाले. अनेक ठिकाणी या निमित्त क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले यांचे स्मरण केले. आज त्यांचा जन्म दिवस. त्यांच्या आईचे नाव लक्ष्मीबाई तर गावचे पाटील असणार्या वडिलांचे नाव खंडोजी नेवसे पाटील होते. 1840 साली जोतीराव फुल्यांशी सावित्रीबाईंचा विवाह झाला. लग्नाच्या वेळी सावित्रीबाईंचे वय नऊ, तर जोतीरावांचे वय तेरा वर्षांचे होते. सावित्रीचे सासरे गोविंदराव फुले हे मूळचे फुरसुंगीचे क्षीरसागर, परंतु, पेशव्यांनी त्यांना पुण्यातील फुलबागेची जमीन बक्षीस दिली म्हणून ते पुण्याला येऊन राहिले व फुलांच्या व्यवसायावरून त्यांना फुले हे आडनाव मिळाले.
सावित्रीबाईंचे पती जोतीराव यांना लहानपणापासूनच मातृप्रेम लाभले नाही. त्यांची मावस बहीण सगुणाऊ यांनीच त्यांचा सांभाळ केला होता. सगुणाऊ एका इंग्रज अधिकार्याच्या मुलाच्या दाई म्हणून काम करायच्या. त्यांना इंग्रजी कळायचे व बोलताही यायचे. त्यांनी आपल्या या ज्ञानाचा उपयोग जोतीरावांना प्रेरित करण्यासाठी केला. जोतीरावही शिक्षणाकडे आकर्षित झाले. सावित्रीबाईंना ख्रिश्चन मिशनर्यांनी लग्नापूर्वी दिलेले एक पुस्तक त्या सासरी घेऊन आल्या होत्या. त्यावरून जोतीरावांनाही एक नवा मार्ग सापडला. त्यांनी स्वतः शिकून सावित्रीबाईंना शिकवले. सगुणाऊ तर सोबत होतीच. दोघींनी रीतसर शिक्षण घेतले.
1 मे. इ.स. 1847 रोजी सावित्रीबाईंनी सगुणाऊला मागासांच्या वस्तीत एक शाळा काढून दिली. ही त्यांची पहिली शाळा. सगुणाऊ तेथे आनंदाने व उत्साहाने शिकवू लागल्या. पुढे ही पहिली शाळा मध्येच बंद पडली. 1 जानेवारी, इ.स. 1848 रोजी भिडेवाड्यात जोतीराव आणि सावित्रीबाईंनी मुलींची शाळा काढली. सार्या कर्मठ समाजाच्या विरोधाला न जुमानता विवाहानंतर शिक्षण घेतले आणि शिक्षक, मुख्याध्यापक बनून शिक्षण दिले.1847-1848 साली केवळ चार वर्षांत 18 शाळा उघडल्या आणि चालवल्या. अभिरुची संवर्धन व चारित्र्याची जडणघडण या गोष्टींकडे फुलेंच्या शाळांमध्ये कटाक्षाने लक्ष दिले जात असे. त्यामुळे फुले दाम्पत्यांच्या शाळांमधील मुलींची संख्या सरकारी शाळेतील मुलांच्या संख्येपेक्षा 10 पटीने वाढली. इतकेच नव्हे, तर फुलेंच्या शाळेतील मुली परीक्षेतही सरकारी शाळेतल्या मुलांपेक्षा गुणवत्तेत सरस ठरल्या. परिणामी, फुले दाम्पत्यांची शैक्षणिक क्षेत्रातील कामगिरीची सर्वदूर प्रशंसा झाली. सगुणाऊंना त्या शाळेत बोलावण्यात आले. तत्कालीन ब्रिटिश भारतातली एतद्देशीय व्यक्तीने काढलेली ही पहिलीच मुलींची शाळा ठरली. 1847-1848 कसल्याही विरोधाला न जुमानता विवाहानंतर शिक्षण घेतले आणि शिक्षक, मुख्याध्यापक बनून शिक्षण दिले. केवळ चार वर्षांत 18 शाळा उघडल्या आणि चालवल्या. यापूर्वी मिशनर्यांनी आणि अन्य लोकांनी काढलेल्या 14-15 शाळा उत्तर भारतात होत्या. या शाळेत सावित्रीबाई मुख्याध्यापिका म्हणून काम पाहू लागल्या. त्या काळात पुण्यातील अन्य भागांतही 2-3 मुलींच्या शाळा त्यांनी सुरू केल्या व काही काळ चालवल्या. मुंबईतल्या गिरगावातही त्याच सुमारास स्टूडन्ट्स लिटररी न्ड सायंटिफिक सोसायटीने ’कमळाबाई हायस्कूल’ नावाची मुलींसाठीची शाळा सुरू केली, ती शाळा 2016 सालीही चालू आहे.
मिशनरी नसलेले पिअरी चरण सरकार यांनी मुलींसाठी पहिली शाळा बारासात टाऊन येथे 1847 मध्ये काढली. शाळेसाठी नवीन कृष्ण मित्र आणि काली कृष्ण मित्र या दोन भावांनी आर्थिक मदत केली. ही शाळा कालीकृष्ण हायस्कूल या नावाने चालू आहे. मुंबईत पारशी लोकांनी 1849 मध्ये पहिली शाळा काढली, पण काही दिवसांतच या शाळेच्या मुलांसाठी आणि मुलींसाठी अशा दोन शाखा झाल्या. संत चोखामेळा मंदिरात त्यांनी दीन-दलितांसाठी शाळा काढली. त्यांच्या या कार्याबद्दल इंग्रज सरकारने त्यांचा गौरव केला होता. असा मान आत्तापर्यंत कोणालाही मिळाला नाही. सावित्रीबाईंनी जे विचार मांडले ते त्यांनी प्रत्यक्ष कृतीत आणले. अध्यापनाचे काम करत असताना त्यांचा मानसिक आणि काही प्रमाणात शारीरिक छळ नातेवाइकांनी, समाजाने, सनातन्यांनी केला. रस्त्यातून जात असताना त्यांना लोकांकडून शिवीगाळ, त्यांच्या अंगावर शेणाचे गोळे भिरकावण्यात आले, घरातील कचरा त्यांच्या अंगावर टाकण्यात आला. पण त्यांना मात्र सत्काराची फुले उधळल्यासारखीच वाटतं. ही सर्व कृत्य त्यांना विद्यार्थ्यांना शिकवण्यासाठीचे प्रोत्साहन असल्याचे वाटत असे. एकदा शाळेत जात असताना चौकातील गुंडांनी सावित्रीबाईंचा रस्ता अडवून, मुलींना आणि महार-मांगांना शिकवणे तू बंद कर नाहीतर तुझी अब्रू शाबूत राहणार नाही, अशी धमकी दिली. हे ऐकताच सावित्रीबाईंनी त्याला चपराक लगावली.
सावित्रीबाई अशा संकटांना तोंड देण्यास समर्थ होत्या. दादोबा पांडुरंग तर्खडकर हे सरकारी-देशी शाळांचे पर्यवेक्षक असताना त्यांनी थोड्या वेळात शाळेने चांगली प्रगती केली, हे भूषावह आहे असा शेरा दिला. शिक्षणाच्या प्रसारासाठी अन्य सामाजिक क्षेत्रातही काम करणे गरजेचे आहे, स्त्रियांचा आत्मविश्वास वाढवणे गरजेचे आहे, हे सावित्रीबाईंनी ओळखले. काही क्रूर रुढींनाही त्यांनी आळा घातला. बाला-जरठ विवाहप्रथेमुळे अनेक मुली वयाच्या बारा-तेराव्या वर्षी विधवा व्हायच्या. ब्राह्मण समाजात विधवा पुनर्विवाह अजिबात मान्य नव्हता. पतीच्या निधनानंतर अशा विधवांना सती जावे लागे किंवा मग त्यांचे केशवपन करून कुरूप बनवले जाई. विरोधाचा अधिकार नसलेल्या या विधवा मग कुणातरी नराधमाच्या शिकार बनत. गरोदर विधवा म्हणून समाज छळ करणार, जन्माला येणार्या मुलाला यातनांशिवाय काहीच मिळणार नाही, अशा विचारांनी या विधवा आत्महत्या करत किंवा भ्रूणहत्या करत. जोतीरावांनी या समस्येवर उपाय म्हणून बालहत्या प्रतिबंधक गृह सुरू केले. सावित्रीबाईंनी ते समर्थपणे चालवले. फसलेल्या वा बलात्काराने गरोदर राहिलेल्या विधवांचे त्या बाळंतपण करत. गृहातील सर्व अनाथ बालकांना सावित्रीबाई आपलीच मुले मानत. याच ठिकाणी जन्मलेल्या काशीबाई या ब्राह्मण विधवेचे मूल त्यांनी दत्तक घेतले. त्याचे नाव यशवंत ठेवले. केशवपन बंद करण्यासाठी नाभिक समाजातील लोकांचे प्रबोधन करणे व त्यांचा संप घडवून आणणे, पुनर्विवाहाचा कायदा व्हावा यासाठी प्रयत्न करणे, अशी अनेक कामे सावित्रीबाईंनी कल्पकतेने पार पाडली. सत्यशोधक समाजाच्या कार्यातही सावित्रीबाईंचा मोठा सहभाग असे. महात्मा फुले यांच्या निधनानंतर (इ.स. 1890) सावित्रीबाईंनी सत्यशोधक समाजाच्या कार्याची धुरा वाहिली. आपल्या विचारांचा प्रसार त्यांनी आपल्या साहित्याच्या माध्यमातून केला. ‘काव्यफुले’ व ‘बावनकशी सुबोध रत्नाकर’ हे काव्यसंग्रह त्यांनी लिहिले. पुढील काळात त्यांची भाषणेही प्रकाशित करण्यात आली.
इ.स. 1896 सालातल्या दुष्काळात सावित्रीबाईंनी समाजाला सत्कार्याचा आदर्श घालून दिला. पोटासाठी शरीरविक्रय करणार्या बाया-बापड्यांना दुष्टांच्या तावडीतून सोडवून त्यांनी त्यांना सत्यशोधक कुटुंबांत आश्रयास पाठवले. त्यांच्या कार्याला हातभार म्हणून पंडिता रमाबाई, गायकवाड सरकार अशा लोकांनी मदतीचा हात पुढे केला. दीडशे वर्षांपूर्वी स्त्री-पुरुष समता व सामाजिक न्याय प्रस्थापित करण्यासाठी चळवळ उभारून तत्कालीन रुढीप्रिय समाज व्यवस्थेशी कडवी झुंज कोणी दिली, तर ती फुले दाम्पत्याने. बालविवाहाला विरोध करून ते थांबले नाहीत, तर विधवांचा पुनर्विवाह करण्याचे सामाजिक उत्तरदायित्व त्यांनी मोठ्या हिकमतीने पार पाडले. विधवांच्या पुनर्विवाहास मान्यता मिळण्यासाठी त्यांनी इंग्रज सरकारपुढे आग्रही मागणी केली आणि या सामाजिक कार्यात फुले दाम्पत्यांना यश येऊन त्यास 1856 मध्ये मान्यता मिळाली.
हे सर्व सावित्रीमाई पतीच्या पावलावर पाऊल टाकून अंधपणे करीत नव्हत्या, तर त्या कार्यावर त्याची निष्ठा होती, म्हणून पती निधनानंतरही त्यांनी सत्यशोधक समाजाचे ‘समता आंदोलन’ पुढे चालू ठेवले. सावित्रीबाई शिकल्या तेव्हा त्याच्या ठायी असणार्या कविमनाला जे काही आढळले ते त्यांनी कविता आणि अभंगाच्या रूपात शब्दबद्धही केले. 1854 साली त्याचा ‘काव्यफुले’ हा काव्यसंग्रह प्रसिद्ध झाला. ‘मातोश्री सावित्रीबाईंचे भाषणे व गाणी ‘या नावाने पुस्तकही 1891 मध्ये प्रसिद्ध करण्यात आले. कित्येक कवितात निसर्गाची मनोरम वर्णनेही आलेली आहेत. काव्यलेखनाप्रमाणेच त्यांनी ‘गृहिणी’ या मासिकात लेखही लिहिले. त्याच्या लेखनाला स्वानुभवाचा भक्कम आधार असल्याने ते लेखन परिणामकारक झाले आहेत. सावित्रीबाईंनी जोतिबांच्या सर्व कार्यात हिरिरीने भाग घेतला स्त्रियांनी शिकावे हे त्यांचे ब्रीद वाक्य होते. अनाथांना आश्रय मिळावा ही त्याची कार्यक्षेत्र त्यांच्या श्रद्धेने प्रभावी झाली. सामाजिक कार्यात पुढाकार घेणे हे त्यांचे ध्येय होते. त्यामुळेच 1876-77 मधल्या दुष्काळात त्यांनी खूप कष्ट केले. पुढे 1897 मध्ये प्लेगची भयंकर साथ आली असताना त्यांनी आपल्या स्वतःच्या प्रकृतीचीही पर्वा न करता प्लेगची लागण झालेल्यांसाठी काम केले. दुर्दैवाने त्या स्वतःच प्लेगच्या भीषण रोगाने बळी ठरल्या आणि 10 मार्च 1897 मध्ये त्यांना मृत्यू आला. समाजातल्या दीन-दलितांना मायेने जवळ करणार्या, स्त्रियांना शिक्षण मिळावे म्हणून धडपडणार्या सावित्रीबाई खर्या अर्थाने जोतिबाच्या सहचरणी म्हणून शोभल्या. त्यांच्या थोर सामाजिक कार्य विषयाची कृतज्ञता म्हणून 1995 पासून 3 जानेवारी हा सावित्रीबाईंचा जन्म दिन हा बालिका दिन म्हणून साजरा केला जातो. क्रांतीज्योती सावित्रीमाईच्या अनमोल योगदानामुळेच आज विविध क्षेत्रांतील महिला जगभरात उंच भरारी घेताना दिसत आहेत. चूल व मूल या जोखडातून महिलांची मुक्ती करून तिला शिक्षणाची कवाडे खुली करून देणार्या क्रांतीबा फुल्यांच्या आयुष्यात जर सावित्रीमाईच्या योगदानाची साथ नसती तर कदाचित क्रांतीबा फुले त्यांच्या कार्यात यशस्वी ठरू शकले नसते, अशा क्रांतीज्योतीला त्रिवार अभिवादन!
– उषा रामलू
गोरेगाव, मुंबई.
9892943727