क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले इंग्रजांकडे धुणी-भांडी करत होत्या… महापौर उषा ढोरे यांच्या वक्तव्याविरोधात आंदोलन
महापौरांनी राजीनामा देण्याची मागणी
पिंपरी-चिंचवड । क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्याबद्दल पिंपरी-चिंचवड शहराच्या महापौर उषा ढोरे यांच्याविरोधात राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिलांनी गुरुवारी आंदोलन केलं आहे. उषा ढोरे यांनी सावित्रीबाई फुले यांच्याबाबत वादग्रस्त वक्तव्य केल्याबाबत राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिलांनी आंदोलन करत महापौरांनी राजीनामा देण्याची मागणी करण्यात आली. महापालिकेतील महापौरांच्या दालनाबाहेर आंदोलन करण्यात आले. यामध्ये राष्ट्रवादीच्या माजी महापौर डॉ. वैशाली घोडेकर, नगरसेविका वैशाली काळभोर, सुलक्षणा धर, माजी नगरसेविका भारती फरांदे, गंगा धेंडे, समता परिषदेच्या कार्यकर्त्या सहभागी झाल्या होत्या. महापौरांचा निषेध असो, महापौरांचा धिक्कार असो, महापौरांनी राजीनामा दिलाच पाहिजे, जय ज्योती, जय क्रांती अशा जोरदार घोषणा यावेळी देण्यात आल्या.
सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त फिनिक्स सोशल ऑर्गनायझेशन यांच्या वतीने सांगवीत कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला महापौर उषा ढोरे उपस्थित होत्या. क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले इंग्रजांकडे धुणी-भांडी करत होत्या. तेथूनच त्यांनी इंग्रजी भाषा आत्मसात केल्याचे विधान महापौरांनी केल्याचा दावा विविध संघटनांकडून केला जात आहे. याबाबत महापौरांना विचारणा केली असता त्यांनी या वक्तव्याला नकार दिला आहे.