ख्राइस्टचर्च । भारताचा 19 वर्षाखालील क्रिकेट संघ मंगळवारी आयसीसी विश्वचषक स्पर्धेच्या उपांत्य फेरीत कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तानशी लढणार आहे. या स्पर्धेत आतापर्यंत मोठ्या फरकाने विजय मिळविणारा भारतीय संघ पाकिस्तानला पराभूत करुन विश्वचषकाच्या अंतिम फेरीत स्थान मिळवण्याचा प्रयत्न करेल. पारंपरिक कट्टर प्रतिस्पर्धी म्हणून अवघ्या क्रिकेटविश्वात हे दोन देश ओळखले जातात. पाकिस्तानकडून भेदक गोलंदाजी तर भारताकडून आक्रमक फलंदाजी असा सामना पाहायला मिळेल. भारत आणि पाकिस्तान यांच्यातील आतापर्यंत झालेल्या 19 वर्षाखालील संघाच्या क्रिकेट सामन्यामध्ये भारताने 12 तर पाकिस्तानने 8 सामने जिंकले आहेत. भारत हा 19 वर्षाखालील क्रिकेट विश्वचषक स्पर्धेचा गतउपविजेता आहे. यापूर्वी झालेल्या साखळी सामन्यांच्या लढतींमध्ये भारताने ऑस्ट्रेलियाला 100 धावांनी पराभूत केले होते तर पीएनजी, झिम्बाब्वे या दोघांना 10 गडी राखून पराभूत केले होते. भारताने बांगलादेशला 131 धावांनी पराभूत करून उपांत्य फेरीत धडक मारली आहे.
भारतीय संघाची फलंदाजी ही शुभम गिल, पृथ्वी शॉवर अवलंबून असेल तर गोलंदाजी अंकुल रॉयच्या खांद्यावर असेल, अंकुलने आतापर्यंत या स्पर्धेत चार सामन्यांत 11 बळी घेतले आहेत. पाकिस्तानच्या फलंदाजीची कमान ही अली जरयाब असिफ आणि रोहिल नझीर यांच्या खांद्यावर असेल तर गोलंदाजीत सर्वांच्या नजरा वेगवान गोलंदाज शाहीन आफ्रिदीवर असतील. भारताने या सामन्यात पाकवर विजय मिळविला तर, विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात भारताचा सामना बलाढ्य ऑस्ट्रेलियाशी होणार आहे. भारताने बांगलादेशला 131 धावांनी पराभूत करुन उपांत्य फेरीत धडक मारली आहे.
अफगाणिस्तानला हरवून ऑस्ट्रेलिया अंतिम फेरीत
आयसीसी 19 वर्षाखालील विश्वचषक स्पर्धेमध्ये बलाढ्य संघांना पराभूत करत दखल घ्यायला भाग पाडणार्या अफगाणिस्तानच्या संघाला उपांत्य फेरीत पराभवाचा सामना करावा लागला. ऑस्ट्रेलियाच्या संघाने 6 विकेट्स आणि 72 चेंडू राखून आफगाणिस्तानला पराभूत केले. नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना अफगाणिस्तानने ईक्रम अली खिलच्या 80 धावांच्या खेळीच्या जोरावर सर्वबाद 181 धावांची मजल मारली. या लक्ष्याचा पाठलाग करताना ऑस्ट्रेलियाने 37.3 षटकांमध्ये चार गड्यांच्या मोबदल्यात विजय मिळवला. ऑस्ट्रेलियाकून जॅक एडवर्ड्सने 70 धावांची खेळी केली. तर गोलंदाजीमध्ये जॉनथम मेरलोने 10 षटकांमध्ये 24 धावा देत 4 विकेट्स घेतल्या. मेरलोने 2 निर्धाव षटकेही टाकली. त्याच्या या कामगिरीसाठी त्याला सामनावीराचा पुरस्कार देण्यात आला.